महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बस धावणार, 100 बसेस भाडेतत्वावर घेणार..!

पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्यासंह एसटी महामंडळाचेही कंबरडे मोडलेय. दुसरीकडे राज्यात इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनही १०० इलेक्ट्रिक बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालीय. पुणे बसस्थानकातून या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. राज्यातील पाच शहरांसाठी पुढील सहा महिन्यांत पुण्यातून या इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. त्यात पुणे-औरंगाबाद, पुणे-नाशिक, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, पुणे-महाबळेश्वर, अशा या बस धावतील.

एसटी महामंडळ पहिल्या टप्प्यात १०० बस भाडेतत्वावर घेणार आहे. त्यातील ३० बसेस पुणे विभागाला दिल्या जाणार आहेत. पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर शहरांत बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. एका बसला पूर्ण चार्ज होण्यासाठी किमान तास लागतील. पूर्ण चार्ज झालेली बस साधारण ३०० किलोमीटर धावेल. या बसची आसनक्षमता ४३ प्रवाशांची असल्याचे समजते.

पुण्यात ३ हजार किलोवॅट क्षमतेचे चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजे सुमारे २ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीच्या सर्व तांत्रिक परवानग्या मिळाल्या आहेत. निधी उपलब्ध होताच तीन महिन्यांत हे स्टेशन उभारून वापरात आणले जाणार असल्याचे समजते.

Share