क्रांती दिनी जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा
गोंदिया 3 : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन 27 जुलै ते 9 ऑगस्ट या क्रांती दिनापर्यंत दिवस प्रत्येक जिल्हा परिषदेवर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 17 ऑगस्ट रोजी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने निर्णयानुसार 9 ऑगस्ट रोजी गोंदिया जिला परिषदेवर क्रांती दिवशी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाड़ी कर्मचारी यूनियन आयटकद्वारे मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी दिली आहे.
सदर आंदोलन अंगणवाडी-बालवाडी कर्मचार्यांच्या मागण्यांसाठी करण्यात येत आहे. या मागण्या अशा आहेत-अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी मदतनिस यांचे मानधन 2017 नंतर राज्य सरकारने वाढविले नाही. त्यांची मानधन वाढ समाधानकारक करण्यात यावी. अंगणवाडी कर्मचार्यांना एकरकमी सेवासमाप्ती लाभाव्यतिरिक्त मासिक पेंशन लागू करण्यात यावे. ती सेवासमाप्ती शेवटच्या मानधनाच्या निम्मी असावी. सेवानिवृत्त कर्मचार्यांना पेंशन देणयात यावी. सर्व मिनी अंगणवाडीचे रूपांतरण अंगणवाडीमध्ये करण्यात यावे. सेविकांना सुपरवायजर पदावर पदोन्नती 50 टक्के व मदतनिस यांना सेविका पदावर पदोन्नती देण्यात यावी. सादिल खर्च 2 हजार रुपयावरून 5 हजार रुपये करण्यात यावे. मोबाइलवर काम करण्याकरिता 500 व 250 रुपयावरुन प्रोत्साहन भत्ता 2 हजार व 1 हजार रुपये करण्यात यावा. अंगणवाडी कर्मचार्यांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यांना वेळोवेळी दुरुस्त करावे लागते. त्यामुळे उत्कृष्ट दर्जाचे मोबाइल देण्यात यावे. तसेच दुरूस्ती खर्च 3 ते 4 हजार रुपये घेणे बंद करावे.केंद्र शासनाने लादलेले पोषण टॅकर अॅप मराठी भाषेत करावे. प्रवास भत्ता देण्यात यावा. शासनाकडून मिळणारे सर्व साहित्य अंगणवाडीमध्ये वेळेवर पोहचविण्यात यावे. अशा एकूण 13 मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेवर 9 ऑगस्ट रोजी आयोजित आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा अध्यक्ष शकुंतला फटींग, जिल्हा सचिव आम्रकला डोंगरे, कोषाध्यक्ष जीवनकला वैद्य यांनी केले आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पौर्णिमा चुटे, विठा पवार, पंचशीला शहारे, जयकुवर मच्छरके, सुनिता मंलगाम, वीणा गौतम, भुमेश्वरी राहंगडाले, अंजना ठाकरे, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, बिजुला तिडके, दुर्गा संतापे, मीनाक्षी पटले, पुष्पा भगत, सुनिता शिवनकर, कंचन शहारे, ज्योती लिल्हारे आदि सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका यांनी केले आहे.