गोंदिया जिल्ह्यातील कोरोना निर्बंधात काही प्रमाणात सूट
• नागरिकांनी काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
गोंदिया 3 : राज्यात कोरोना विषाणूचा (कोविड-19) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने कडक निर्बंध
लागू करुन जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी घोषित केले आहे. यापुर्वी लागू असलेल्या लॉकडाऊन संदर्भात
सुधारीत मार्गदर्शिका निर्गमीत करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी
उपाययोजनेचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यात खालीलप्रमाणे सुधारीत आदेश निर्गमीत करण्यात येत आहे.
सर्व अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने/आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच
शनिवारी व रविवार सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. सर्व अत्यावश्यक नसलेल्या वस्तू व सेवांची
दुकाने/आस्थापना (शॉपिंग मॉल सहीत) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत तसेच शनिवारी सकाळी
7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सर्व अत्यावश्यक नसलेल्या वस्तू व सेवांची दुकाने/आस्थापना रविवारी
पुर्णपणे बंद राहतील.
सर्व सार्वजनिक उद्याने व खेळांची मैदाने व्यायाम, चालणे, धावणे व सायकलींग करीता सुरु राहतील. सर्व
शासकीय/निमशासकीय आणि खाजगी कार्यालये 100 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु राहतील. तथापि, प्रवासातील गर्दी
टाळण्यासाठी कामाच्या तासाचे नियोजन करावे. जी कार्यालये Work from home अंतर्गत कार्यरत आहेत ते
त्याचप्रमाणे सुरु राहतील. सर्व कृषि विषयक उपक्रम, बांधकाम विषयक कामे, औद्योगिक उपक्रम व सामानांची
वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. सर्व व्यायामशाळा, योगा केंद्र, केश कर्तनालय/सलून, ब्युटी पार्लर, स्पा केंद्र (AC
वापरास मनाई आणि 50 टक्के क्षमतेने) सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु
राहतील. तसेच सदरची दुकाने/आस्थापना रविवारी पुर्णपणे बंद राहतील.
सर्व सिनेमागृहे, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स (स्वतंत्र आणि मॉलमधील) इत्यादी ठिकाणी पुढील आदेशापर्यंत बंद
राहतील. सर्वप्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. राज्य शिक्षण विभाग आणि उच्च आणि तांत्रिक
विभागाचे आदेश शाळा आणि महाविद्यालयांसाठी लागू राहतील. सर्व रेस्टॉरेन्ट/हॉटेल/खानावळी इत्यादी सोमवार ते
शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत 50 टक्के आसन क्षमतेनुसार डाईन इन व 4 वाजेनंतर पार्सल व घरपोच
सुविधा सुरु राहील (शनिवार व रविवार या दिवशी फक्त पार्सल व घरपोच सुविधा सुरु राहील). रात्री 9 ते सकाळी 5
वाजेपर्यंत बाहेर फिरण्यास मनाई राहील. गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा करण्यावर, राजकीय कार्यक्रम,
सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूका, निवडणूक प्रचार, रॅली, निषेध मोर्चे यावर निर्बंध कायम राहील.
वरील उपक्रम/क्रियाकलाप/बाबी सुरु ठेवलेल्या ठिकाणी नियमितपणे मास्कचा वापर करण्यात यावा. सदर
ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरीता/प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्यासाठी साबण किंवा हॅन्ड सॅनिटायजर ठेवणे
आवश्यक राहील. सदर ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर पाळले जाणे आवश्यक राहील. सदर
ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांकरीता एकमेकांत सामाजिक अंतर पाळले जाण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतरावर
वर्तुळे तयार करणे यासारख्या बाबी कराव्यात.
सदर आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग
प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार शिक्षेस
पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची
अंमलबजावणी 3 ऑगस्ट 2021 पासून करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.