दुकानांच्या वेळांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..! व्यापाऱ्यांच्या इशाऱ्याला मुख्यमंत्री ठाकरे यांचे खणखणीत उत्तर..

राज्यातील ज्या जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे, तेथील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. मात्र, कोरोना रुग्णसंख्या अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध कायम असतील, अशी माहिती मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी दिली.

याबाबतचा शासन निर्णय (जीआर) आज (साेमवारी) सायंकाळपर्यंत काढणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

सांगली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, दुपारी ४ वाजेनंतर लोक बाजारात येत असल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची मागणी दुकानदारांकडून होत होती.

व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही
पुण्यासह राज्यातील काही व्यापारी संघटनांनी तर राज्य सरकारने दुकानांच्या वेळा न वाढविल्यास कायदा मोडून दुकाने सुरु ठेऊ, अशी भूमिका घेतली होती. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, की राज्यातील जनतेच्या हिताची आपल्याला काळजी असून, व्यापाऱ्यांच्या अशा धमक्यांना आपण घाबरत नाही.

ठाकरे म्हणाले, की जीव वाचविण्याचा वेळ येते, तेव्हा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तयार होत नाही. ती चिंता आम्हाला कारावी लागते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेल्या सुचनेनुसार कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. राज्यातील वेगवेगळ्या शहरांचा अनियंत्रित विकास झाला आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. जिथं भेटी दिल्या आणि जिथं दिल्या नाही, त्या सर्व भागांना सारखीच मदत देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘वर्क फ्रॉम होम’ करा
खासगी कार्यालयांनी कामाच्या वेळांत बदल करून वेगवेगळ्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या शिफ्ट लावाव्यात, एकाच वेळी कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. केंद्र सरकारकडून राज्याला तीन गोष्टींची अपेक्षा असल्याचे सांगताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की ‘एनडीआरएफ’चे नियम जुने, कालबाह्य झाले असून, ते बदलण्याची गरज आहे. महसूल विभागाने केलेले पंचनामे गृहित धरून विमा काढलेल्या व्यापाऱ्यांना मदत तत्काळ करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुंबई लोकल सुरु करणार नाही:
दरम्यान, मुंबई लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी काहीही घोषणा केली नाही. पहिल्या टप्प्यात लोकल सुरू करणं शक्य नाही. काही गोष्टी शिथील करीत आहोत. त्याचे परिणाम, दुष्परिणाम पाहूनच निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Share