अखेर ‘या’ शहरात 15 ऑगस्टपासुन हेल्मेटसक्ती; हेल्मेटशिवाय पेट्रोलही मिळणार नाही
नाशिक 01 : दुचाकीवर प्रवास करत असताना होणाऱ्या अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर नाशिकमध्ये आता हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकचे पोलिस आयुक्त दिपक पांडे यांनी नागरिकांना दुचाकीवरून प्रवास करत असताना हेल्मेट घालणं बंधनकारक केलं आहे.
दरम्यान, 15 ऑगस्टपासुन नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती करण्यात आली असून हेल्मेट नसल्यास दुचाकी चालकाला पेट्रोलही मिळणार नाही. त्यासंदर्भात नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पोलिस आयुक्तांनी नाशिकच्या सर्व पेट्रोलपंप चालकांना केलं आहे. तसेच नागरिकांनाही नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.
नाशिककरांना आता हेल्मेटसक्ती केली असल्याने नागरिक या नियमाचं काटेकोरपणे पालन करणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच यापुर्वीही नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा यासाठी अनेक शक्कल लढविण्यात आल्या होत्या पण आता हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नसल्याने नागरिकांना हेल्मेट घालावंच लागणार आहे.
पोलिस आयुक्त दिपक पांडे यांच्या या हेल्मेटसक्तीच्या आवाहनाला नाशिककर नागरिक कसा प्रतिसाद देतात, याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागुन आहे. तसेच आता येणाऱ्या काळात यातुनही पुणेकरांप्रमाणे नाशिककरांना सुट मिळणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.