गोंदिया पोलिसांच्या रडारवर असलेला जहाल नक्षली छत्तीसगडमध्ये जेरबंद
डॉ. सुजित टेटे
गोंदिया ११- गेल्या १० वर्षापासून पोलिसांच्या रडारवर असलेल्या जहाल नक्षलवाद्यास पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. रमेश मडावी(४५) असे या नक्षलवाद्याचे नाव आहे. रमेश हा १९९८-९९ मध्ये नक्षलवाद्यी कारवायामध्ये सामील झाला होता. रमेश मडावीला छत्तीसगडमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सी ६० पथकाने छत्तीसगड जिल्ह्यातील सुकमा जिल्ह्यात जाऊन ही कारवाई केली.
रमेश मडावी हा जहाल नक्षलवादी विविध प्रकारच्या १३ गुन्ह्यात आरोपी आहे. गेल्या १० वर्षापासून पोलीस त्याच्या मागावर होते. पोलिसांना रमेश मडावी हा छत्तीसगडमधील सुकुमा जिल्ह्यात असल्याची माहिती गोंदिया पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार गोंदिया पोलिसांचे एक पथक छत्तीसगडला रवाना झाले. त्यानंतर छत्तीसगड पोलिसांच्या सहाय्याने सापळा लावून रमेश मडावी याला अटक कऱण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव हे तीन तालुके जंगलव्याप्त आहेत. या तालुक्यांत ९० च्या दशकापासून नक्षल चळवळ सक्रीय आहे. नक्षल्यांचा बिमोड करण्याकरिता गोंदिया पोलिस रात्रंदिवस झटत आहेत. पोलिसांनी अनेक नक्षल्यांचा खात्मा देखील केला. नक्षल्यांच्या अनेक कारवाया नेस्तनाबूत केल्या. त्यामुळे आता जिल्ह्यातून नक्षल चळवळ आता नाहीशी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १३ नक्षली कारवायांमध्ये सक्रीय असलेला जहाल नक्षलवादी रमेश उर्फ हिडमा मडावी हा गोंदिया पोलिसांना हवा होता. १९९८-१९९९ मध्ये तो नक्षली चळवळी मध्ये भरती झालेला होता.कारवाईसाठी सी ६० दलाचे पथक मडावीच्या शोधात गोंदिया पोलीस गेल्या दहा वर्षांपासून त्याचा माग काढत होते. मात्र त्याचा सुगावा लागत नव्हता. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी त्या जहाल नक्षलवाद्याचे प्रकरण उघडून त्याला अटक करण्याचे निर्देश आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना दिले होते. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अतूल कुळकर्णी यांनी ते आव्हान स्वीकारले. अतूल कुळकर्णी यांना जहाल नक्षली रमेश उर्फ हिडमा मडावी छत्तीसग़ड राज्यातील सुकवा जिल्ह्यात एका गावी राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांना सूचना देत सी ६० दलाचे पथक तयार केले. व छत्तीसगड पोलीस, सीआरपीफ तसेच गोंदिया येथील सी ६० दलाचे पथक नक्षलरित्या अतिसंवेदनशील असलेल्या सुकमा येथे पोहोचले. त्यांनी मंगळवारी छापेमारी करून त्या जहाल नक्षलवाद्याला अटक करून जेरबंद केले.
काय आहे, त्याचा इतिहास -रमेश उर्फ हिडमा मडावी हा 1998-99 मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर त्याने देवरी दलममध्ये एसीएम तसेच एलओएस कमांडर म्हणून काम केले. देवरी दलममध्ये असताना चिचगड पोलीस ठाणेंतर्गत असलेल्या मगरडोहड्या हद्दीत पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला केला होता. तसेच चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, गावकऱ्यांवर हल्ले, सार्वजनीक मालमत्तेची नासधूस असे 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रकारे देवरी पोलिसांच्या हद्दीत खून, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस याचे दोन गुन्हे आणि डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथकावर चकमकीचा एक गुन्हा दाखल आहे.
रमेशमुळे मिळणार नक्षली कारवायांची माहिती-रमेश उर्फ हिडमा मडावी हा जहाल नक्षली आहे. त्याने गोंदिया जिल्ह्यात अनेक घटना घडविल्या केल्या. त्याचबरोबर त्याने छत्तीसगड आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील अशा घटना केल्या असाव्या, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांच्या रडारवर असलेला रमेश गोंदिया पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे त्याने यापूर्वी केलेल्या घटनेची माहिती पोलिसांना आता त्याच्याकडून मिळणार आहे. त्या माहितीच्या आधारे पोलिसांना अजूनही नक्षल्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
5 दिवसांचा पीसीआर, 12 लाखांचे बक्षीस-गोंदिया पोलिसांच्या सी 60 पथकाने रमेश उर्फ हिडमा मडावी याला अटक केली. पोलिसांनी त्याला न्यायालयासमक्ष हजर केले. न्यायालयाने पोलिसांच्या वकिलाचे म्हणणे लक्षात घेता रमेशला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नक्षलवादी रमेशवर पोलिसांनी 12 लाखांचे बक्षीस ठेवले होते.