“ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्राला किती राग आहे, ते दिसतंय”- नाना पटोले

मुंबई 26 : आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण अशा प्रश्नांवरून रोजच राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे सरकारने आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या पारड्यात टाकला आहे. त्यावरून आता भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध होताना दिसत आहे. त्यातच आता नाना पटोले यांनी पुन्हा ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून केंद्र सरकरवर निशाणा साधला आहे.

मी विधानसभेचा अध्यक्ष असताना पहिला ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडला होता. मात्र, ओबीसी समाजाचं नुकसान करण्याचं षडयंत्र केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकार ओबीसी समाजाची जनगणना करणार आणि त्यासंबंधीचा आकडादेखील देणार नाही, असं केंद्र सरकरने संसदेत स्पष्ट केलंय. त्यामुळे ओबीसी समाजाबद्दल केंद्राला किती राग आहे, हे लक्षात येतंय, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

29 जुलै रोजी बारामतीत पक्ष विरहित एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू या मोर्चासाठी बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही. या मोर्चात भाजप आणि राष्ट्रवादीसह सर्व पक्षाचे नेते सहभागी होणार होते. कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे परवानगी नाकारली गेल्याचं कळतं आहे. त्यामुळे आता मोर्चा होणार की नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Share