पगार, पेन्शन सुटीच्या दिवशीही मिळणार..! रिझर्व्ह बॅंकेकडून ‘या’ प्रणालीच्या नियमांत बदल, 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी होणार..!
पगार, पेन्शन किंवा ईएमआय भरण्याच्या दिवशी सुटी आली, तर लोकांचे पेमेंट अडकून पडत असे. त्यामुळे पगाराच्या दिवशी तरी बॅंकेला सुटी यायला नको, यासाठी अनेक जण देव पाण्यात घालून बसत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI) सामान्य लोकांची ही मोठी समस्या दूर केली आहे. म्हणजे, आता सुटीच्या दिवशीही पगार, पेन्शन आणि ईएमआयची काम करता येणार आहेत. रिझर्व्ह बँकेने त्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंचलित क्लीयरिंग हाऊस’ (NACH) चे नियम बदलले आहेत.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जूनमध्ये पतधोरणाचा आढावा घेताना ‘नाच’ (Nach) प्रणालीसाठीचे नवे नियम जाहीर केले. रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) अंतर्गत ग्राहकांना 24 तास, सातही दिवस ‘नाच’ सुरू राहणार आहे. सध्या ही यंत्रणा फक्त बँकांच्या कामकाजाच्या दिवशी, म्हणजेच सोमवार ते शनिवारपर्यंत काम करते. मात्र, आता 1 ऑगस्ट 2021 पासून Nach चे नवीन नियम लागू होणार आहेत.
‘Nach’ची वैशिष्ट्ये
‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI)तर्फे चालविण्यात येणारी ही एक ‘बल्क पेमेंट सिस्टम’ आहे. त्यात एकाच वेळी बर्याच लोकांना पगार वा पेन्शन देण्यात येते. ही प्रणाली लाभांश, व्याज, पगार आणि पेन्शनची कामेही करते. वीजबिल, गॅस बिल, टेलिफोन बिल, पाणीबिल, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंडात गुंतवणूक, विमा, विमा प्रीमियम भरणे आदी कामेही Nach अंतर्गत करता येतात.
बँकांच्या कामकाजाच्या दिवशीच आतापर्यंत ही सर्व कामे करता येत होती. मात्र, आता ती आठवड्याच्या शेवटी किंवा शनिवारी-रविवारीही करता येणार आहेत. तसेच काही तासांचे काम काही सेकंदात होणार आहे. त्यासाठी मोबाइल वा कंप्यूटरची गरज लागेल. आतापर्यंत पगार वाटपाचे काम ‘इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम’द्वारे (ECS ) होत होते; परंतु आता हे काम Nach करणार आहे. ECS चाच Nach हा एक प्रगत प्रकार आहे. मात्र, ECS पेक्षा ते जलद व सक्षम आहे. Nach डेबिट आणि Nach क्रेडिट एकत्र काम करतील.
‘डीबीटी’ अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतरित करण्यासाठी NACH सर्वात शक्तिशाली माध्यम असून, एका बटणावर लाखो लोकांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करता येणार आहे. कोरोना काळात सरकारने यावरुनच शेतकर्यांच्या खात्यावर पैसे पाठविले होते.