डॉ.वर्षा गंगणे यांना वैचारिक लेखन पुरस्कार

देवरी: येथिल गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात कार्यरत डॉ.वर्षा गंगणे यांना साहित्य विहार संस्था नागपूर च्या वतीने त्यांच्या ‘स्त्रीविकास आणि अनुत्तरित प्रश्न ‘ या पुस्तकास राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक ,पटवर्धन स्मृती पुरस्कार 2020 देण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातील लेखकांनी पाठवलेल्या पुस्तकांतून देवरी येथील वर्षा गंगणे यांना पुरस्कार मिळणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्या उत्कृष्ट लेखिका असून यापूर्वीही त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यात विश्वकवी सुधाकर गायधनी यांना संस्थेतर्फे ज्ञानयोगी पुरस्कार देऊन गौरविले.यासाठी ते सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रातुम नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ.संजय दुधे ,प्रमुख अतिथी स्वरूपात संस्कृत कालिदास विद्यापीठ रामटेक येथील माजी कुलगुरू डॉ.पंकज चांदे उपस्थित होते. याशिवाय साहित्य विहारच्या अध्यक्ष डॉ.आशा पांडे,उपाध्यक्ष प्रतिभा आपटे, सचिव डॉ.अर्चना अलोणी ,तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुधाकर गायधनी उपस्थित होते. विविध साहित्य क्षेत्रातील लेखक, कवी, साहीत्य प्रसारक,परीक्षक यांचा देखील याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
डॉ.वर्षा गंगणे यांच्या लेखनाची स्तुती करीत स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, रोख देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा पुरस्कार मिळाल्याचा लेखिकेस विशेष आनंद झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share