Video: भारतात झालीय जगातील सर्वात मोठी ढगफुटी..! पण ढगफुटी म्हणजे काय, ती कशी होते, जाणून घेण्यासाठी वाचा..!
महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी मुसळधार पावसाने झोडपून काढली आहे. या पावसामुळे रायगड, साताऱ्यात दरडी कोसळून अनेकांचे संसार उघड्यावर आले. कुटुंबाच्या कुटुंब दरडीखाली दबली गेली. अनेकांना जीव गमवावा लागला.
मुसळधार पावसामुळे ढगफुटीची चर्चा सुरु झाली आहे. माध्यमातून तर ढगफुटी झाल्याच्या बातम्या प्रसारीत होत आहेत. मात्र, ढगफुटी कधीही किनारपट्टी भागात होत नाही, तर उंच प्रदेशात होत असते.
महाराष्ट्रात ढगफुटीबाबत होणारी चर्चा व्यर्थ आहे. यानिमित्ताने ढगफुटी म्हणजे नेमकं काय, ती कशी आणि कुठे होते, याचा मागोवा घेणार आहोत.
ढगफुटीची प्रक्रिया
गरम हवा व आद्र्रतेमुळे पाण्याचे अब्जावधी थेंब ढगांत विखुरतात. कधीकधी ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो, याला ‘अपड्राफ्टस्’ म्हणतात. वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब कधीकधी ३.५ मिमीहून मोठे होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब एकमेकांत मिसळून आणखी मोठे होतात. हवेचा स्तंभ मोठमोठ्या थेंबासह वर चढतो.
जत्रेतील पाळणा जसा झपकन खाली येतो, तसा स्तंभाने तोलून धरलेले मोठे थेंब वेगाने खाली झेपावतात. जमिनीच्या दिशेने हवेचा स्तंभ तयार होतो. त्याला ‘डाऊनड्राफ्ट’ म्हणतात. थेंबाचा वेग सुरवातीला ताशी १२ किमी असतो. तो शेवटी ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.
वादळी पावसाला घेऊन येणाऱ्या ढगाला ‘कुमुलोनिम्बस’ म्हटले जाते. हा एक लॅटिन शब्द आहे. ‘क्युम्युलस’ म्हणजे एकत्र होत जाणारे, तर ‘निम्बस’ म्हणजे ढग. थोडक्यात झपाट्याने एकत्र होत जाणारे ढग.
हा ढग मोठा असला, तरी त्याचा विस्तार जास्त नसल्याने लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभच कोसळतो. मोठे थेंब व प्रचंड वेगामुळे सगळे अक्षरश झोडपून काढतो. काही मिनिटांत प्रचंड पाऊस होत असल्याने पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते.
पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली, तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून प्रचंड वेगाने खाली निघतात. सोबत मोठ्या प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.
हवेचा स्तंभ वेगाने जमिनीवर आदळतो, तेव्हा तितक्याच वेगाने ती ऊर्जा आजूबाजूला फेकली जाते. वावटळ उठते. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभच कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.
हिमालयासाठी ढगफुटी ही नवी गोष्ट नाही. तेथे अनेकदा असे ढग फुटतात. मात्र, मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. त्यावेळी ८ तासांत ९५० मिमी पाऊस पडला होता.
भारतात झालीय जगातील सर्वात मोठी ढगफुटी…
लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी ही जगातील आजपर्यंतची सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. त्यावेळी लेहमध्ये सर्वात मोठे नुकसा झाले होते.
ढगफुटीच्या प्रमुख घटना
* लेह (६ ऑगस्ट २०१०)- एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस
* बरोट, हिमाचल प्रदेश, (२६ नोव्हेंबर १९७०)- एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस
* पोर्ट बेल, पनामा (२९ नोव्हेंबर १९११)- पाच मिनिटांत ६१.७२ मिमी पाऊस
* प्लंब पॉईंट, जमेका (१२ मे १९१६)- पंधरा मिनिटात १९८.१२ मिमी पाऊस
* कर्टिआ, रुमानिया (७ जुलै १९४७)- वीस मिनिटांत २०५.७४ मिमी पाऊस
* व्हर्जिनिया, अमेरिका (२४ ऑगस्ट १९०६)- चाळीस मिनिटांत २३४ मिमी पाऊस