Success Story: बंदूक सोडली , पुस्तक वाचली आणि झाली मॅट्रिक पास
◾️गोंदिया /देवरी पोलीसांच्या जिद्दीला सलाम
प्रा. डॉ.सुजित टेटे
देवरी 19: प्राप्त माहितीनुसार सुमारे तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी चळवळ सोडण्यापूर्वी १६ वर्षीय रजुला हिडामी वर अर्धा डझनहून अधिक गुन्हे होते आणि तिने पोलिसांवर गोळीबार करण्यात भाग घेतला होता आता नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली आणि दहावीच्या परीक्षेत 51.80% गुण मिळविले व महाराष्ट्र पोलीस होण्याची ईच्छा दर्शविली आहे.
मुळची गडचिरोली येथील अतिदुर्गम व नक्षलग्रस्थ भागातील लाव्हारी खेड्यातील, रजूला हिडामी हीने शस्त्रे व शस्त्रास्त्रांचे नक्षल प्रशिक्षण घेतले होते आणि गडचिरोलीच्या कोरची-खोब्रेमेंदा-कुरखेडा(KKD) दलममध्ये सक्रिय काम केले आणि नक्षल चळवळी मध्ये सक्रिय होती . त्यानंतर २०१८ मध्ये गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पणानंतर पोलिसांनी तिला पुन्हा शिक्षण देण्यास मदत केल्याने तिच्या आयुष्यात बदल घडून आले.
या मुळच्या आदिवासी मुलीने दलमतून पळायच्या आधी नक्षलमध्ये सुमारे दोन वर्षे घालविली होती . तिचे कोवळे वय लक्षात घेता, पोलिसांनी तिला शरण जाण्याची योजना ऑफर केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्या अंतर्गत तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक संदिप आटोळे यांच्या मदतीने व नक्षल सेलच्या पोलिसानी रजुला हिडामी हिला देवरी येथील आदिवासी मुलींच्या शाळा व वसतिगृहात दाखल केले.
२०१९ ते २०२१ मध्ये गोंदियात आठवी ते दहावीच्या परीक्षेत तिला मराठी भाषा आणि गणित विषयाच्या संकल्पना समजावण्यासाठी नक्षल सेलमधील देवरी येथील कर्माचार्यांनी तिला ‘ट्यूशन शिक्षक’ म्हणून काम केल्याने तिच्या अभ्यासामध्ये दुप्पट वाढ झाली. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी तिच्यासाठी शाळेचे एक किट, स्कूल बॅग, पुस्तके, सायकल आणि गणवेश देखील खरेदी करून दिले. नक्षल सेलने रजूला हिडामी ला नवीन वातावरणात स्थायिक व समायोजित करण्यास मदत केली.
वडील गमावलेल्या राजुलाचे वय १६ वर्षांचे असता तिला नक्षलवाद्यांनी पळवून नेले. तीन बहिण-भावापैकी सर्वात लहान मुलीने जंगलावर चरण्यासाठी गुरांना नेले होते जिथे नक्षलवाद्यांनी तिचा सेलफोन हिसकावून घेतला आणि दिशानिर्देश विचारण्याच्या बहाण्याने तिला बरोबर घेऊन गेले.
बंडखोरांबरोबर दोन दिवस घालविल्यामुळे आता नक्षलवाद्यानी तिला चुकीच्या मार्गाने नेले होते, असे सांगून माओवाद्यांनी तिला दिशाभूल केली. नंतर नक्षलवाद्यांनी तिला शस्त्राव्यतिरिक्त वॉकी-टॉकी आणि इतर गॅझेट्स वापरण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर, ती दलमामध्ये लोकप्रिय ठरली आणि गटाच्या नित्यकर्मांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी ‘टॅब’ वापरली. देवरी येथील एका पोलिस कर्मचारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना सांगितले की, मुलीचे शिक्षण पुन्हा सुरू करण्यात अनेक अडथळे आले. “शाळेतील प्रवेश बंद होते आणि मुलीकडे कागदपत्रे सुद्धा नव्हती.” पोलिसांनी सांगितले की त्याने तहसिल कार्यालयीन लिपीक व त्यांची पत्नी शिक्षिका म्हणून मुलीच्या कुटूंबाला भेट देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवून दिली.
तिच्या आईने पुन्हा लग्न केले आणि इतरत्र स्थायिक झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मुलीची काळजी घेण्याचे ठरविले. “स्पेशल सेलमधील काही पोलिसांनी तिला अभ्यासासाठी मदत केली आणि तिने चांगला प्रतिसाद दिला. मी तिला पॉलिटेक्निकचा पाठपुरावा करावा असा प्रयत्न केला पण तिला पोलिस बनण्याची इच्छा आहे, ”असे एका गुप्त पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
आता पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये तैनात असलेल्या अपर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी सांगितले की, त्यांनी मुलीला जवळजवळ ‘दत्तक’ घेतले होते. ते म्हणाले , “मला तिच्याकडून बऱ्याचशा लोकांच्या,आकांशा आहेत.” डीआयजी नक्षल श्रेणी संदीप पाटील अंतर्गत गडचिरोली आणि गोंदिया येथील विशेष कक्ष अनेक आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विशेष सहाय्य करत आहेत.