गोंदिया आरपीएफची कामगिरी : सोन्याच्या दागिन्यांनी हरविलेला बॅग केला परत

◾️सोन्याच्या किंमती दागिन्यांनी भरलेला बॅग परत केला प्रवाशी महिलेला

गोंदिया 15: रेल्वे स्थानकावर गस्तीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाला 1 लाख 4 हजार 600 रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला बॅग मिळाला. योग्य कार्यवाही करून व खर्‍या मालकाचा शोध घेऊन रेल्वे सुरक्षा दलाने तो बॅग परत केला. ही घटना 14 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर घडली.

सविस्तर वृत्त असे की, रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक उषा बिसेन, आरक्षक नासिर खान, प्रधान आरक्षक एन.ई. नगराळे, एस.के. नेवारे व आरक्षक डी.के. लिल्हारे 14 जुलै रोजी रेल्वे स्थानकावर गुन्हेगारीवर आळा घळण्याच्या उद्देशाने गोपनीयरित्या गस्त करीत होते. दरम्यान त्यांना सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास प्लॉटफॉर्म-4 वर आरएमएस ऑफिसजवळ गुलाबी रंगाचे एक लेडीज हँडबॅग बेवारस पडून असल्याचे दिसले. त्याबाबत त्यांनी रेल्वे स्थानकात जवळपास इतर प्रवाशांना विचारपूस केली. परंतु सर्वांनी बॅग आपला नसल्याचे सांगितले.

त्यानंतर त्या बॅगची पंचांसमक्ष विडिओग्राफी करीत उघडून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात 1 सोन्याचा मंगळसूत्र, 1 सोन्याची चेन, 1 सोन्याची नथ, 2 जोडी (चार नग) बालकाच्या हाताचे चांदीचे कडे, चांदीचा किल्ल्यांचा 1 गुच्छा, 2 नग चांदीचे पायाचे अंगठ्या, 1 जोडी आर्टिफिशियल कानाचे झुमके, 1 नग आर्टिफिशियल कंठहार, 2 नग आर्टिफिशियल साडी पिन, 1 जोडी आर्टिफिशियल कानाची बाली, 1 जोडी आर्टिफिशियल लटकन असा एकूण 1 लाख 4 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज आढळला.

सदर बॅगमध्ये महागडे दागिने बघून त्वरित रेल्वे सुरक्षा दलाचे सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले व देखाव्याच्या आधारावर बॅगच्या खर्‍या मालकाचा शोध घेण्यात आला.

अशी घडली घटना…

थोड्याच वेळात मनीष विजय खोब्रागडे (वय 37) रा. टेमनी, बटाना (ता.जि.गोंदिया) हे आपली पत्नी निकिता व मुलासह रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात हजर झाले. त्यांनी सांगितले की, ते इतवारी-दुर्ग लोकल गाडीने गोंदियावरून राजनांदगावला जाण्यासाठी प्लॉटफॉर्मवर सदर बॅग व इतर सामानांसह बसून गाडीची वाट बघत होते. पत्नी आपल्या मुलाला दूध पाजत होती. दरम्यान गाडी आली व ते घाईगडबडीत इतर सामान घेऊन गाडीत चढले. मात्र बॅग प्लॉटफॉर्मवरच विसरले. दरम्यान गाडी गोंदियावरून रवाना झाली होती. त्यांनी गाडीत आपल्या सामानांची तपासणी केल्यावर सदर बॅग नसल्याचे व प्लॉटफॉर्मवरच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरम्यान पुढील आमगाव स्थानकात गाडी थांबताच ते रोडमार्गाने गोंदियाच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयात उपस्थित झाले व प्रकरणाची वास्तविकता सांगितली.

या आधारावर उपस्थित पंचांसमक्ष सदर 1 लाख 4 हजार 600 रुपयांच्या दागिन्यांच्या ऐवजाने भरलेली बॅग योग्य कार्यवाही करून त्यांच्या सुपूर्द करण्यात आली. त्यामुळे सदर महिलेने आपले हरविलेले किंमती सोन्याचे दागिने पुन्हा प्राप्त केले व रेल्वे सुरक्षा दल गोंदियाचे आभार व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share