जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घारपिंडे कुटुंबियांना हिम्मत
गोंदिया,दि.11 : शनिवारी 10 जुलै रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरावर वीज कोसळली. सुदैवाने ज्यावेळी वीज कोसळली त्यावेळी घरात कुणीही नव्हते त्यामुळे मोठी जिवितहानी टळली.
आज दि.11 जुलै रोजी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी गोरेगाव तालुक्यातील सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या घरी जावून त्यांच्या घराची प्रत्यक्ष पाहणी करुन घारपिंडे कुटूंबाला धीर दिला. यावेळी जिल्हाधिकारी यांचेसमवेत उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार सचिन गोसावी, नायब तहसिलदार श्री रहांगडाले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, निरीक्षण अधिकारी निलेश देठे, तलाठी श्रीमती हस्तरेखा बोरकर व पुरवठा निरीक्षक समीर मिर्झा उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सोनी येथील देवचंद घारपिंडे यांच्या कुटुंबाशी संवाद साधन संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दैनंदिनी कामासाठी उपयोगात येणाऱ्या वस्तू गोळा करून तात्पुरती मदत म्हणून रेशन किट प्रदान केली. घारपिंडे कुटूंबाचे वीज पडून घर जळाल्यामुळे त्यांच्या कुटूंबाची तात्पुरती राहण्याची सोय प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी श्री खवले यावेळी म्हणाले, एक व्हाट्सअप ग्रुप तयार करुन घारपिंडे कुटूंबाची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी गावातील इच्छुक नागरिकांनी मदत करावी व माझ्याही नावाचा त्यात समावेश करावा, तसेच सामाजिक संघटन एन.जी.ओ. यांनीसुद्धा पुढाकार घेऊन सदर कुटूंबीयांची मदत करावी, कारण प्रशासनाकडून जेव्हा मदत येईल तेव्हा सदर कुटुंबीयांची मदत निश्चितच करण्यात येईल परंतु आज घडीला घारपिंडे कुटुंबाची मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी यांनी खाजगी मदत म्हणून आपल्या खिशातून रोख स्वरूपात पाच हजार रुपयांची तात्काळ मदत केली असून जिल्ह्यातील इतर नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे.