विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य…
मुंबई : शिवसेनेकडे विधानसभेचं अध्यक्षपद हवं आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंत्रिपदाचा देखील बळी देऊ नये, अशी चतूर भूमिका भास्कर जाधवांनी मांडली होती. तसंच मी विधानसभेचं अध्यक्ष व्हावं अशी चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे, असा दावा भास्कर जाधवांनी केला होता. यानंतर अनेक तर्क वितर्क लावले जात होते. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केलं आहे.
आमचा तीन पक्षांचा निर्णय स्वच्छ झालाय, विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबध नाही. तिन्ही पक्षांनाही काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे, त्या निर्णयावर कायम आहोत, असं शरद पवार यांनी सांगितलं.
महाविकासआघाडीतील पक्षांनी स्वबळाची भाषा करण्यात काहीही गैर नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करणार की नाही? त्यामुळे ते आपलं बळ वाढवण्याचा प्रयत्नात असणार. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही… यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे… कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.