आधुनिक शेती तंत्रज्ञान काळाची गरज – आमदार सहसराम कोरोटे
देवरी येथे कृषी संजीवनी मोहीम समारोप व ट्रायकोकार्ड निर्मिती प्रयोगशाळेचे उद्घाटन
देवरी 3: पारंपारिक शेती व्यवसायामुळे उत्पादन खर्च जास्त होऊन निव्वळ नफा फारच कमी मिळतो.या कारणाने आदिवासी बहुल भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे कृषीचा विकास दर(GDP) कमी होऊन राज्याच्या व देशाच्या बाजारपेठांमध्ये आर्थिक मंदी आलेली आहे. सध्या शेतकरीवर्ग हा खूप अडचणीत आलेला असून आपण खचून न जाता शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवला पाहिजे तसेच कृषी क्षेत्रातील झालेले संशोधनानुसार अभ्यासपूर्ण शेती करावी.तसेच भात शेती मधील कमी उत्पादकतेची कारण मिमांसा शोधून डोळसपणे तसेच व्यापारी दृष्टीकोन ठेवला पाहीजे. आपली शेती अधिक फायदेशीर करावयाची असल्यास आधुनिक शेती तंत्रज्ञान ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आमगांव देवरी क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी केले आहे.
1 जुलै 2021 रोजी हरीत क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा शासननिर्णयाप्रमाणे ” कृषी दिन” म्हणून साजरा केला गेला. कृषिदिनाचे औचित्य साधून कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप व ट्रायकोकार्ड निर्मिती प्रयोगशाळा उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरगाव अर्जुनी क्षेत्राचे आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे होते.
देवरीचे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये आधुनिक भात शेतीचे तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले.यामध्ये निसर्गाचा लहरीपणा व हवामानातील होणारे बदल,पर्जन्यमान लक्षात घेता शेतकऱ्यांनी आपली रणनीती बदलली पाहिजे. त्यासाठी कमी कालावधीत तयार होणाऱ्या कोईमतूर -51साख्या अधिक उत्पादन देणार्या भाताच्या वाणाची निवड करावी. त्याचबरोबर भात लागवडीचे नवीन तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करावा. त्यामध्ये चारसूत्री पद्धत, श्री पद्धत,मनुषचलीत ड्रम सीडर पेरणी यंत्राचा वापरा बाबत मार्गदर्शन केले. नागपूर विद्यापीठाचे कीटकशास्रज्ञ डॉ हरीश सवाई यानी भाताची पिकाची कमी उत्पादकतेची कारणे कोणती आहेत? त्यामध्ये प्रामुख्याने कीड-रोगांचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव होतो आणि भातपिक त्याला बळी पडते.ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा.असे सांगताना ट्रायकोग्रामा हा मित्रकीटक खोडकीडीच्या अंडीमध्ये स्वतः ची अंडी घालून स्वतः ची पिढी पूर्ण करतो.त्यामुळे शत्रूकीडींची अंडी नासून नष्ट होतात. पर्यायाने शत्रूकीडींच्या जीवनक्रमामध्ये अडथळा निर्माण होते त्यामुळे खोडकीड येतच नाही. तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पट्टा पद्धती व नियंत्रित भात लागवड पद्धतीचा अवलंब करावा. कीड रोगावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क या जैविक कीटकनाशकांची आपल्या शेतातच तयार करून वापर करावा. आज कृषी संजीवनी कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी कृषी चिकित्सालय येथे ट्रायकोग्रामा चीलोनिस या परोपजीवी मित्रकीटकाचे कार्ड तयार करण्याची प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी देवरी तालुक्यात फळबाग लागवडीस खूप संधी असून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर फळबाग लागवड करून आपली उन्नती साधावी असे आवाहन केले. कार्यक्रमांमध्ये तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर हरिष गवाई देवरीचे तालुका कृषी अधिकारी जी.जी.तोडसाम, चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी, विकास कुंभारे,सडक अर्जूनीचे शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण कापगते हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचा औचित्य साधून कृषिचिकीत्सालय देवरीच्या प्रांगणात छोटेखानी प्रदर्शनी मांडले होते. त्यामध्ये दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करणे,तसेच चारसुत्री ,श्रीपध्दत,पट्टा पध्दत,ड्रमसीडरने पेरणी इत्यादी प्रात्यक्षिके दाखवून सादरीकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास तालुक्यातील कृषी मित्र, शेतकरी कृषि पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, माविमचे महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपकला गौतम व आभार प्रदर्शन चंद्रकांत कोळी आणि मानले.