अनुसूचित जातीच्या कुटुंबप्रमुखाचा करोनामुळे मृत्यू झाल्यास स्माईल योजना
प्रतिनिधी / भंडारा : एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांच्यामार्फत कोविड 19 या जागतिक महामारीत अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी support for Marginalized Individuals for Livelihoods Enterprie (SMILE) स्माईल ही व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना विचाराधीन आहे.
या योजनेमध्ये रुपये 1 लाख ते 5 लाख पर्यंत कर्ज मिळणार असून यामध्ये एनएसएफडीसीचा सहभाग 80 टक्के तर भांडवल अनुदान 20 टक्के मिळणार आहे. या योजनेकरिता व्याजदर 6 टक्के असून परतफेड कालावधी 6 वर्ष आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुढील पात्रता आवश्यक आहे. अर्जदार हा अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा. (कुटुंब प्रमुखाच्या राशनकार्डवर सदर सदस्याचे नाव असणे बंधनकारक आहे.) मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 च्या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींकरिता महानगरपालिका, नगरपालिका यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र, स्मशानभूमी प्राधिकरणाव्दारे दिलेली पावती, एखाद्या गावात स्मशानभूमी नसल्यास गटविकास अधिकाऱ्याने दिलेले मृत्यू प्रमाणपत्र यापैकी एक दस्ताऐवज आवश्यक आहे.
सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पनाचा दाखला (3 लाखा पर्यंत), कोविड-19 मुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहे. कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने उपरोक्त वरील माहितीसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित भंडारा या कार्यालयाशी अथवा https://forms.gle/7mG8CMecLknWGt6K7 या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित भंडारा जिल्हा व्यवस्थापक व्हि.आर. ठाकूर यांनी केले आहे.