बारावीच्या परीक्षेचे निकाल ३१ जुलै पर्यंत जाहीर करा : सर्व राज्य मंडळांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज सर्व राज्य मंडळांना बारावीच्या परीक्षेचे अंतर्गत मूल्यांकन निकाल ३१ जुलैपर्यंत घोषित करण्याचे निर्देश दिलेत. यासह सुप्रीम कोर्टानं केरळ सरकारला उद्या अकरावी परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर कोर्टाने आंध्र प्रदेश सरकारलाही उद्या म्हणजे २५ जूनपर्यंत बारावीच्या परीक्षेच्या धोरणाबद्दल सांगण्याचे निर्देश दिलेत.


न्यायमूर्ती ए. एम खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, प्रत्येक मंडळाला त्यांची स्वतःची योजना विकसित करावी लागेल.
आजपासून दहा दिवसात ही योजना लवकरात लवकर तयार करण्यात याव. तसंच CBSE आणि CISCE साठी दिलेल्या कालावधीच्या मुदतीप्रमाणे ३१ जुलै २०२१पर्यंत अंतर्गत मूल्यांकन निकाल जाहीर करण्यात यावा, असे निर्देश खंडपीठानं सर्व राज्य मंडळांना दिलेत. कोविडसारख्या महामारीच्या परिस्थिती राज्य मंडळाने परीक्षा घेऊ नये, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.


सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, राज्य मंडळ परीक्षांबाबत कोर्ट एकसारखी योजना लागू करता येणार नाही. सर्व राज्य मंडळांनी स्वतःची योजना तयार करावी. दरम्यान या याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत म्हणजेच २५ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Share