गादीवाफ्यावर भातरोपे तयार केल्यास भातशेती फायद्याची -जी.जी. तोडसाम
देवरी तालुक्यात कृषिसंजीवनी सप्ताहास प्रारंभ
प्रहार टाईम्स
देवरी21: खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेती अडचणीत येऊन अचानक भाताची रोपे सुकून जातात.अशा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांचा संपुर्ण हंगाम वाया जातो. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतो.अशा परिस्थितीत गादीवाफ्यावर रोपांची नर्सरी तयार करुन पुनर्लागवड केल्यास भातशेती फायद्याची होईल असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषिअधिकारी जी.जी.तोडसाम यानी केले आहे. ते देवरी तालुक्यातील सावली येथे कृषिसंजीवनी सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
तालुक्यात कृषिविभागाच्या निर्देशानुसार आज २१ जून २०२१ पासून कृषिसंजीवनी सप्ताहास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सावली येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.तसेच सावलीसह नियोजित इतर गावामध्ये ३% मीठाच्या द्रावणाची प्रक्रिया, गादीवाफा तंत्रज्ञान, मनुष्यचलीत ड्रमसीडर पेरणीयंत्र , भाताची नियंत्रित लागवड प्रात्यक्षिके दाखवण्यात आले. गादीवाफा नर्सरी पध्दती अवलंब केल्यास खुप जोमदार रोपे तयार करता येतात. एक मीटर रुंद व १० सेंमी उंच गादीवाफे तयार केल्याने जादा पाऊस झाल्यास बाजूच्या पाटातून पाण्याचा निचरा होतो.त्यामुळे भातरोपे कुजत नाहीत व पिवळे पडणार नाहीत. तसेच पावसाचा खंड पडल्यास गादीवाफ्यातील ओल लवकर हटत नाही व जास्तच खंड पडला तर बाजूच्या पाटातून पाणी देता येते.गादीवाफ्यातील रोपे पुनर्लागवडीसाठी काढतानी सहजासहजी उपसून येतात. कणखर व जोमदार रोपे तयार झल्याने रोग कीडीना बळी पडत नाहीत. या कार्यक्रमात चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी यानी पट्टापध्दतीने,नियंत्रित लागवडीने भातशेती बाबत माहीती दिली.देवरीचे मंडळकृषिअधिकारी विकास कुंभारे यानी उगवणक्षमता तपासणी करण्याची घरगुती पध्दतीची माहीती दिली. कृषिपर्यवेक्षक शिवकुमार येडाम,कृषिसहाय्यक कापगते, सलामे यांच्याकडून भात ३% मीठाच्या द्रावणाची ,गादीवाफा , मनुष्यचलीत ड्रमसीडर इत्यादी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच या कार्यक्रमास सावलीचे शेतकरी, माविमचे महीला मंडळ ,व सखीमंचचे सदस्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सलामे तर आभार कापगते यानी मानले.