नितीन गडकरींचा मेगा प्लान! आता ‘या’ इंधनावर चालणार वाहने : ६० ते ६२ रुपये असेल एका लिटरची किंमत

वृत्तसंस्था / दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सर्वसामान्य जनता त्रासलेली असताना केंद्र सरकार पुढील ८ ते १० दिवसांत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार ऑटोमोबाइल क्षेत्रात फ्लेक्स-फ्ल्यूल इंजिन अनिवार्य करण्याच्या विचारात आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. या निर्णयानं देशातील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल असा दावा गडकरी यांनी केला आहे.


गडकरी यांनी रोटरी संमेलन २०२०-२१ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. वाहनांमध्ये फ्लेक्स-फ्यूएल इंजिन लावल्यास इंधन म्हणून इथेनॉलचा वापर करता येईल. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. इथेनॉलकडे पर्यायी इंधन म्हणून पाहता येऊ शकतं. याची किंमत ६० ते ६२ रुपये प्रतिलीटर इतकी आहे. तर देशात पेट्रोलचा दर १०० रुपये प्रतिलीटर इतका पोहोचला आहे. त्यामुळे इथेनॉलचा वापर केल्यानं नागरिकांचे प्रतिलीटर ३० ते ३५ रुपये वाचतील, असंही गडकरी म्हणाले.
“मी परिवहन मंत्री आहे आणि उद्योग क्षेत्रासाठी लवकरच एक आदेश जारी करण्यात येणार आहे. केवळ पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या गाड्या देशात असणार नाहीत. यापुढे लोकांना वाहनांमध्ये फ्लेक्स फ्ल्यूएलचाही पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे लोकांना इंधन म्हणून १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येईल. येत्या ८ ते १० दिवसांत यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर देशातील वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन अनिवार्य होईल”, असं नितीन गडकरी म्हणाले.


जगभरात सध्याच्या घडीला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स-फ्लूएल इंजिनाची निर्मिती केली जाते. त्यामुळे वाहनचालकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय वाहनामध्ये उपलब्ध होतो, असंही गडकरींनी सांगितलं.

Print Friendly, PDF & Email
Share