स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील: मुख्यमंत्री
मुंबई 19– करोना संकटकाळातही काही राजकीय पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. आम्हीही स्वबळाचा नारा देऊ. सत्तेसाठी शिवसेना कधीही लाचारी पत्करणार नाही.पण, लोक चिंतेत असताना स्वबळाचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष कॉंग्रेसच्या भूमिकेचा समाचार घेतला.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख ठाकरे यांनी शनिवारी शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला.
त्यावेळी त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या कॉंग्रेसचा नामोल्लेख टाळून भूमिका मांडली. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरते असू नये. ते अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं असावं. न्याय्य हक्क मागण्यासाठी देखील स्वबळ लागते.नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार? सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेऊन सर्वांनी करोना संकट निवारणावर लक्ष द्यावे, असेही त्यांनी सुनावले. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखवलेली ताकद म्हणजे स्वबळ, असा शाब्दिक टोलाही त्यांनी लगावला.
राज्यात आज आपलं काम बोलतयं. त्यामुळे अनेकांच्या पोटात मुरडा येतोय. सत्ता न मिळाल्याने काहींचा जीव कासावीस होतोय, अशा शब्दांत ठाकरे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. हिंदुत्व ही काही पेटंट कंपनी नाही.
महाविकास आघाडीत गेलो म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडले नाही. ते आमच्या हृदयात आहे. हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे. पहिल्यांदा देश आणि नंतर प्रादेशिकता. शिवसेनेच्या वाटचालीचे सर्व श्रेय शिवसैनिकांचे आहे.रक्तपात करणे हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणे हा त्याचा गुण आहे. रक्तपात नव्हे; तर रक्तदान ही शिवसैनिकाची ओळख आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.