ऑक्सिजन गळतीत मुलाच्या मृत्यूनंतर सरकारकडून मिळाले 10 लाख; पैसे घेऊन सून फरार
नाशिक 19– करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. त्यातच अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता, कुठे ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. नाशिकमध्ये झालेल्या देखील ऑक्सिजन गळतीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. या घटनेत मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सरकराने आणि महापालिकेने प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे घोषित केले होते.
घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे उघड्यावर पडलेल्या कुटुंबांना सरकारकडून आर्थिक आधार देण्यात आला. मात्र येथील एका कुटुंबातील सून सरकारकडून मिळालेले १० लाख रुपये घेऊन फरार झाली असून तिने सासू सासऱ्यांना सपशेल वाऱ्यावर सोडले.
आपल्या सूनकडूनच फसवणूक झाल्याचे कळताच वयोवृद्ध दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठून मदतीची याचना केली. पिरसिंग महाले आणि लता महाले असं या दाम्पत्याचं नाव आहे. सूनेने मदतनिधीसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांवर सासू आणि सासऱ्यांचे आंगठ्याचे ठसे घेतले होते. त्यानंतर शासनाकडून मिळालेली मदत लंपास केली. त्यामुळे वयोवृद्ध दाम्पत्य निराधार झालं आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाली होती. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेत २१ जण मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना सरकारने मदत जाहीर केली होती.