गोंदिया रेल्वेस्थानकावर 9 लाख रुपये जप्त- रेल्वे पोलिसांची कामगिरी

गोंदिया 16-गोंदिया रेल्वेस्थानकावर संशयास्पदरित्या वावरणार्‍या इसमाकडून रेल्वे पोलिसांनी तब्बल 8 लाख 90 हजार 750 रुपये जप्त केले. राजकुमार देवांगण रा.राजनांदगाव असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई 15 जून रोजी करण्यात आली.


गोंदिया रेल्वे पोलिस अधीक्षक राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकावर पोलिस पथक गस्तीवर असताना मुख्यद्वाराकडील तिकीट खिडकीजवळ एक इसम संशयास्पदरित्या वावरताना आढळला. पोलिस पथक त्याच्याकडे जात असताना त्याने पळ काढला. दरम्यान पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव राजकुमार देवांगण असून जवळील बॅगमध्ये मोठी रक्कम असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी दोन पंचासमक्ष बॅगमधील रक्कम मोजली असता ती 8 लाख 90 हजार 750 रुपये आढळली. आरोपीने रक्कमेसंदर्भात कोणताही पुरावा न दिल्याने रक्कम जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले व रक्कमेसंंदर्भात माहिती आयकर विभागाला दिली. ही कारवाई प्रभारी अधिकारी संदीप गोंडाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि प्रविण भिमटे, मनोज गुप्ता, संजय नेवारे, किशोर ईश्वर, अरूण गोंदोळे, अजय बर्वे, चंद्रकांत भोयर, कुणाल गिरनतवार, धिरज घरडे, सुनिता मडावी यांनी केली.

Print Friendly, PDF & Email
Share