राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक : पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला

-उद्यापासून अंमलबजावणी

वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यात कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांवर आता हळूहळू शिथिलता येत आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी ५ टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता २५ टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १८ जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
“पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रीडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी असेल”, असेही मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Share