हे काय ! देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राज्यातील राजकारणात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथील सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा देखील झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा फोटो ट्विट करून, माहिती दिली आहे. “माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.” असे फडणवीस यांनी ट्विट केले आहे.

शरद पवारांवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी अनेकदा विविध कारणांसाठी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे आता फडणवीसांनी देखील पवारांची भेट घेतली असल्याचे एक कारण सांगितले जात आहे. याशिवाय राज्यात सध्या मराठा आरक्षण व अनेक महत्वाचे मुद्यांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने याबाबतही या भेटीत चर्चा झाली असावी असेही बोलले जात आहे.

दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. महाराष्ट्रात ओबीसीसाठी राजकीय आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असे सांगत फडणवीस यांनी आरक्षण कशाप्रकारे घालवले हे समोर ठेवायचे असल्याचे सांगितले. आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकार कारणीभूत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Print Friendly, PDF & Email
Share