बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स १ जूनला देशभर ‘काळा दिवस’ साजरा करणार!


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून योग गुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) वाद सुरू आहे. निवासी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, अ‍ॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. तसेच, याबाबत बाबा रामदेव यांनी ‘जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी’, असे इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.
गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला ‘स्टुपिड’ (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही अलोपॅथीला विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण, बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली होती.

बाबा रामदेव यांच्याविरोधात 1 हजार कोटींचा मानहानीचा दावा
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना धाडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केली तक्रार
अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, बाबा रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवीत आहे, हा एक गुन्हा आहे. आयएमएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share