मोठी बातमी : चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय : विजय वडेट्टीवार


चंद्रपूर : जिल्ह्यातली दारू बंदी उठवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. फडणवीस सरकारच्या काळात चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय झाला होता. चंद्रपूरच्या शेजारच्या गडचिरोलिमध्ये मात्र दारूबंदी कायम आहे. दारुबंदीच्या निर्णयानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री वाढली होती, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार पालकमंत्री झाल्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त निवेदनं दारूबंदी उठवण्यासाठी आली होती, तर 33 हजार निवेदनं ही बंदी कायम ठेवण्यासाठी आली होती. त्यानंतर राज्य सरकारनं सनदी अधिकारी श्री झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली.

या समितीने परिस्थितीची समिक्षा केली आणि त्यांचा अहवाल दिला. “दारूबंदीनंतर या भागात गुन्हेगारी वाढला आहे, निकृष्ट आणि अवैध दारूचे प्रकार वाढले आहेत, असा अहवाल या समितीने दिला. तसंच अवैध दारू विक्री प्रकरणी 4042 महिला आणि 322 लहान मुलांवर गुन्हे दाखल झालेत. दारूबंदीचे दुष्परिणाम दिसून येत होते.

त्यामुळे मग लोकांची आणि विविध माहिती घेऊन झा समितीने अहवाल दिला. त्यानंतर आता चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असंही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

Print Friendly, PDF & Email
Share