धान खरेदीवरून ठाकरे सरकार तोंडघशी, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

गोंदिया – जिल्ह्यात 29 लाख क्विंटलपर्यंत रब्बीच्या पिकाचे उत्पादन निघाले आहे. मात्र आजपर्यंत 1 क्विंटलही धानाची खरेदी झालेली नाही. आज घडीला प्रशासनानुसार खरेदी केंद्रांची मर्यादा तीन ते चार लाख क्विंटल धान खरेदी करण्याची आहे. किमान 25 लाख क्विंटल धान 15 दिवसात खरेदी करणे अपेक्षित आहे. मात्र शासन, प्रशासनाकडे धान खरेदीची कोणतीही यंत्रणा दिसत नाही. धान खरेदी होणार की नाही? हा प्रश्न आहे. कोरोना व धान खरेदीवर सरकार तोंडघशी पडले आहे’, असे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते काल (26 मे) गोंदिया जिल्ह्याच्या दौर्‍यावर असताना माध्यमांशी बोलत होते.धान खरेदीवरून ठाकरे सरकार तोंडघशी, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन कोरोना संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदी व कोरोना संदर्भात आढावा घेतला.

‘आघाडी सरकार सर्वस्तरावर अपयशी’

‘राज्यातील आघाडी सरकार सर्वस्तरावर अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा करणे हे सरकारचे काम आहे. एकही घोषणा शासनाला पूर्ण करता आली नाही. शासनाने 1 मे पासून धान खरेदीसाठी सातबारा नोंदणी सुरू केली. यावरही शेतकर्‍यांनी नोंदणी केली म्हणजे धान खरेदी केलीच पाहिजे हे सक्तीचे नाही, असे राज्य सरकारने लिखीत निर्देश दिले. हे सर्वथा चुकीचे आहे. धानाची संपूर्ण खरेदी व निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जातो. या प्रक्रियेसाठी राज्य सरकारला केवळ यंत्रणा उभारायची असते’, असे फडणवीस म्हणाले.

‘सीबीआय चौकशीची मागणी करणार’

‘गोंदिया जिल्ह्यात उत्पादनानुसार कमीत कमी 25 लाख क्विंटल धान खरेदी 15 दिवसात होणे आवश्यक आहे. खरेदीचे पोर्टल आजपासून (26 मे) सुरू करण्यात आले. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात 38 केंद्रे सुरू झाली आहेत. त्या केंद्रांवर 1 क्विंटलही धान खरेदी झालेली नाही. ज्या नवीन केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यांच्याकडे पुरेशी गोदामांची व्यवस्था नाही. प्रशासनानुसार आज घडीला खरेदी सुरू केल्यावर साठवण मर्यादा केवळ 4 लाख क्विंटल आहे. मागील काळात ज्या संस्थांनी धान खरीदीत गैरप्रकार केला, त्याच संस्थांना परत जिल्हा प्रशासनाने धान खरेदीची परवानगी दिली आहे. या प्रकरणी आपण सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे’, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा आघाडी सरकारला इशारा

‘शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे 1200 रुपये क्विंटल दराने व्यापार्‍यांना धान विकावे लागत आहे. भाजप शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आजपासून (27 मे) आंदोलन करीत आहे. शासन यावर तोडगा काढीत नसेल तर आम्ही कोरोनाच्या निर्बंधाचे पालण करून रस्त्यावर उतरू’, असा इशाराही फडणवीसांनी दिला.

Print Friendly, PDF & Email
Share