?मृतदेहाची अदलाबदली : गडचिरोली कोविड सेंटरचा भोंगळ कारभार

♦️दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोविड १९ मुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा संतापजनक प्रकार जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात सोमवारी २४ मे रोजी निदर्शनास आला. याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड केंद्रात राघोबा भोयर यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांचा मृतदेह सकाळी दहा वाजता देण्यात येईल, असे नातेवाईकांना सांगण्यात आले. त्यानुसार नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी कोविड केंद्रात गेले असता, मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला. भोयर यांचा मृतदेह कोणतीही चौकशी न करता सकाळी आठ वाजताच खासगी वाहनाने सिरोंचाकडे पाठविला तर, सिरोंचा येथील व्यक्तीचा मृतदेह गडचिरोलीतच ठेवण्यात आला. या प्रकारामुळे दुःखात असलेल्या नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागला. सदर प्रकार नातेवाईकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर भोयर यांचा मृतदेह दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कोविड केंद्रात परत आणण्यात आला.
या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मृतकाच्या मुलगा स्वप्नील भोयर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.

दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची हाकलपट्टी : जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ . रूळे
सदर प्रकरणात निष्काळजीपणाने काम करणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांची कामावरून तात्काळ हाकलपट्टी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल रूळे यांनी दिली. मात्र कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास खातरजमा करून मृतदेह नेण्याची जबाबदारी संबंधित आप्तेष्टांची असते. मात्र रूग्णाचे आप्तेष्ट याची खबरदारी न घेता मृतदेह नेण्यासाठी घाई करतात. सामेवारी हाच प्रकार घडला. मृतकांच्या आप्तेष्टांची केंद्रावर गर्दी उसळली होती. मृतदेह नेण्यासाठी वाहन केंद्रासमोर उभे होते. अशा स्थितीत आप्तेष्टांनी मृतदेहाचा चेहरा बघून ते स्विकारण्याचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक होते, मा़त्र मृतदेह अदलाबदलीचा प्रकार लक्षात येताच तात्काळ मृतदेह संबंधित आप्तेष्टांच्या सुपूर्द करण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share