‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी 6 नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपालांकडे सुपुर्द करण्यात आली होती. नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब यांनी ही यादी राजभवनावर पोहचवली होती. त्यानंतर आतापर्यंत राज्यपालांनी या यादीवर सही केलेली नाही. त्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून पुन्हा राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारं काम केलं पाहिजे. आता त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, असा टोला संजय राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे. 12 आमदारांच्या नावाची फाईल भुताने पळवली नसून ती राजभवनातच आहे, हे देखील स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी त्यावर सही करावी, असं सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का?, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर सहा-सात महिने निर्णय होत नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचं भान ठेवावं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावांची यादी मागितली होती. सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे यावरुन राजकारण तापलं होतं. त्यानंतर यादी राज्यपालांकडेच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share