संजय राऊतांना काही कामधंदा नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे नसल्याची माहिती समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर टीका केली आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने 12 सदस्यांची शिफारस विधान परिषदेवर नामनियुक्त करण्यासाठी केली. यावर मुंबई हायकोर्टाने राज्यपालांना जाब विचारला आहे. ही 12 जणांच्या नावांची शिफारस केलेली ‘यादी’ असलेली फाईल राज्यपाल सचिवालयातून अदृश्य झाल्याचे समोर आलं आहे. हा तर धक्कादायक वगैरे प्रकार नसून सरळ भुताटकीचाच प्रकार आहे. फार तर त्यास गूढ गौप्यस्फोट म्हणता येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर फडणवीसांनी राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.

राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली वक्तव्य आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे, असा पोरखेळ कुणीही करू नये. संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं म्हणत फडणवसांनी राऊत यांना टोला हाणला आहे.

दरम्यान,महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. त्यात भूत, प्रेत, देव, देवस्कीला थारा नाही. तरीही मुख्यमंत्र्यांनी पाठवलेली एक महत्त्वाची फाईल सहा महिने सापडत नाही. आता ती गायब झाली. हे कसले लक्षण म्हणायचं?, असंही संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं होतं.

Print Friendly, PDF & Email
Share