लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’ या वक्तव्याशी आमचा संबंध नाही; सीरमचं स्पष्टीकरण

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मात्र लसीचा पुरवठा नसल्यामुळं राज्यातील लसीकरण लांबणीवर पडलंय. अशात लसीच्या तुटवड्याला एक प्रकारे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं होतं.

सीरम इन्स्टिट्यूटच्या नियामक विभागाचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला 22 मे रोजी पत्रं पाठवलं आहे. या पत्रातून सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेवर सीरमने स्पष्टीकरण दिलं आहे. सुरेश जाधव यांच्या वक्तव्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही, असं सीरमने स्पष्ट केलं आहे.

सीरमकडून कोणत्याही प्रकारचं विधान करण्यात आलेलं नाही. जाधव यांच्या विधानाशी आमचा संबंध नाही. तसेच जाधव यांनी जे सांगितलं तो आमचा विचार नाही. हे मी तुम्हाला सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्यावतीने सांगत आहे, असं सिंह यांनी या पत्रात म्हटलं आहे. कोविशील्डचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच कोविड 19विरोधातील लढाईत आम्ही सरकारच्या सोबत आहोत, असं सांगतानाच पुनावाला हेच आमच्या कंपनीचे एकमेव अधिकृत प्रवक्तेही असल्याचं प्रकाश कुमार सिंह यांनी म्हटलंय.

दरम्यान, केंद्र सरकारनं लसीच्या साठ्याबाबत काहीही माहिती न घेता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या गाइडलाइन्सवर विचार न करताच 18 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली, असं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं होतं.

Share