जगभरात कोरोनाचा हाहाकार : कोरोना लस विक्रीतून नऊजण बनले नवे अब्जाधीश
‘ग्रुप पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ने केला दावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : जगभरात हाहाकर उडवून देणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या विक्रीतून तब्बल नऊ जण नवे अब्जाधीश झाले आहेत. लसीवरील पेटंट काढून त्याच्या उत्पादनावरील बंधने दूर करण्याची मागणी करणाऱ्या ‘ग्रुप पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ने हा दावा केला आहे.
‘ग्रुप पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स’ ही संस्था विभिन्न संघटना आणि कार्यकर्त्यांचा गट आहे. या गटाकडून कोविड-19 लसीचे पेटंट संपविले जावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. या गटाच्या म्हणण्यानुसार नवीन अब्जाधीशांनी गरीब देशांना गरजेनुसार लस उपलब्ध करून दिली तर त्यासाठी येणाऱया खर्चापेक्षा त्यांना मिळालेला पैसा दीड पटीने अधिक असल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
कोरोना लस विक्रीतून नऊ जणांच्या संपत्तीत 19.3 अब्ज डॉलर्स म्हणजे साधारण 141 कोटींची भर पडली आहे. अगोदरच अब्जाधीश असलेल्या अन्य आठ जणांच्या संपत्तीतसुद्धा 32.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या नऊ अब्जाधीशांच्या संपत्तीतून गरीब देशांतील संपूर्ण लोकसंख्येचे एकापेक्षा जास्त वेळा लसीकरण करणे शक्य आहे.
नवीन अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन बेन्सल अक्वल स्थानी आहेत. त्यानंतर फायझर लस उत्पादक बायोएण्टेकचे प्रमुख उगर साहीन हे आहेत.
कॅन्सीनो बायोलॉजिक्स या चिनी पंपनीचे तीन सहसंस्थापकदेखील नवीन अब्जाधीशांच्या यादीत आहेत.
सिरम इन्स्टिटय़ूटच्या आदर पुनावाला यांची संपत्ती गतवर्षीच्या 2.2 अब्ज डॉलर्सवरून कोरोना काळात 12.7 अब्ज डॉलर्सवर गेली आहे. कॅडिलाचे चेअरमन पंकज पटेल यांची संपत्तीसुद्धा गतवर्षीच्या 2.9 अब्ज डॉलर्सवरून 5 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
लसींवरील पेटंट हटविण्याची मागणी
लसींवरील पेटंट हटविल्यामुळे विकसनशील देशांमध्येदेखील लस उत्पादन वाढविण्यास आणि जगाला साथीच्या रोगातून लवकरात लवकर मुक्त होण्यास मदत होईल, असे ग्रुप्स पीपल्स व्हॅक्सिन अलायन्स या संस्थेचे तसेच गरीब देशांचेही म्हणणे आहे. अमेरिकेसारख्या देशांनी आणि पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनीही पेटंट हटविण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.