नागपूरमध्ये दिव्यांग व्यक्तीच्या कृत्रिम पायाद्वारे ड्रग्सची तस्करी
पोलिसांच्या या धकडेबाज कारवाईमुळे अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीच्या अवैध धंद्यात लिप्त आरोपींचे कंबरड मोडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांगाच्या कृत्रिम पायातून ड्रग्स तस्करीचादेखील पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
नागपूर – नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी एकाच वेळी तब्बल ८६ ठिकाणी छापेमारी करून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. पोलिसांच्या या धकडेबाज कारवाईमुळे अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीच्या अवैध धंद्यात लिप्त आरोपींचे कंबरड मोडले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिव्यांगाच्या कृत्रिम पायातून ड्रग्स तस्करीचादेखील पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
सात तासांत ८६ ठिकाणी छापेमारी –
उपराजधानी नागपूर शहरात अमली पदार्थ तस्कर आणि विक्रेते आपले जाळे वेगात पसरत असल्याने तरुणी नशेच्या आहारी जात आहेत. लॉकडाऊनदरम्यान ड्रग्स विक्रेत्यांचा धंदा तेजीत असल्याचे निदर्शनात येताच नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली. गुन्हे शाखेने सात तासांत ८६ ठिकाणी छापेमारी करत १३ लाखांचे एमडी ड्रग्स, ७.८ लाखांची चरस आणि अडीच किलो गांजा जप्त केले आहे. एवढेच नाही, तर 20 आरोपींनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या धकडेबाज कारवाईमुळे शहरातील ड्रग तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस आयुक्तांनी दिले होते आदेश –
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील ड्रग तस्कर तसेच ड्रग पेडलर्स यांच्याकडे एकाच वेळी नियोजनबद्धरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाईसाठी एकूण ८६ पथके तयार करण्यात आली होती. ज्यांनी एकाच वेळी ८६ ठिकाणी छापे टाकले. पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दिव्यांगाच्या पायातून ड्रग्स तस्करी –
गुन्हे शाखा पोलिसांच्या हाती एक असा आरोपी लागला आहे, ज्याला एक पाय नाही. त्याला कृत्रिम पाय बसवण्यात आला असून त्याच्या आतमध्ये ड्रग्स ठेऊन तस्करी केली जायची. आरोपी हा दिव्यांग असल्याने त्याच्यावर कुणालाही संशय जायचा नाही. मात्र, पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ड्रग्ससह अटक केली आहे.