सरकारचा WhatsAppला इशारा; नवी पॉलिसी मागे घ्या अन्यथा…

नवी दिल्ली : Whatsappच्या प्रायव्हसी पॉलिसीवरुन निर्माण झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीए. यावरुन पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या वादानंतर व्हॉट्सअॅपनं १५ मे पासून आपली प्रायव्हसी पॉलिसी भारतासहित अनेक देशांमध्ये लागू केली आहे. Whatsappच्या पॉलिसीवरुन दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकार आणि Whatsappकडून उत्तरही मागितलं आहे. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं Whatsappला आपली पॉलिसी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयाकडून यासंबंधी १८ मे रोजी एक पत्रही पाठवण्यात आलं आहे, इंडियन एक्स्प्रेसनं याबाबत वृत्त दिलं आहे.

१८ मे रोजी Whatsappला पाठवलेल्या एका पत्रात इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की, Whatsappची नवी पॉलिसी भारतीय युजर्सची गोपनियता आणि डेटा सिक्युरिटीचा मुद्दाच संपवून टाकणार आहे. पत्रात म्हटलंय की, करोडो भारतीय युजर्स संवादासाठी प्रामुख्याने Whatsappवर अवलंबून आहेत. त्यामुळे Whatsappनं नवी पॉलिसी लागू करुन बेजबाबदारपणाचं दर्शन घडवलं आहे. 

पॉलिसीप्रकरण हायकोर्टात प्रलंबित

Whatsappच्या नव्या पॉलिसीचं प्रकरण दिल्ली हायकोर्टात अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, मंत्रालयानं स्पष्टपणे म्हटलंय की, Whatsappची नवी पॉलिसी भारतीय कायद्यांची मोडतोड करणारी आहे. दरम्यान, मंत्रालयानं Whatsappकडे सात दिवसांमध्ये यावर उत्तर मागितलं आहे तसेच जर यावर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर Whatsappविरोधात कठोर पावलं उचलली जाऊ शकतात, असा इशाराही दिला आहे. 

नवी पॉलिसी १५ मे पासून लागू

Whatsappची प्रायव्हसी पॉलिसी १५ मे पासून लागू करण्यात आली आहे. आपल्या पॉलिसीत Whatsappनं म्हटलंय, जर युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी स्विकारली नाही तर त्यांचं अकाउंट डिलीट केलं जाणार नाही पण हळूहळू सर्व फिचर्स बंद केले जातील. यामुळे एखाद्यानं पाठवलेल्या मेसेजच नोटिफिकेशन आपल्याला मिळेल पण तो मेसेज वाचता येणार नाही. 

Whatsappची नवी प्रायव्हसी पॉलिसी काय आहे?

Whatsapp ने स्पष्टपणे म्हटलयं की, त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी पॅरेंट कंपनी Facebookला लक्षात ठेवून बनवण्यात आली आहे. नव्या पॉलिसीनुसार Whatsappचा डेटा फेसबूक, इन्स्टाग्राम आणि पार्टनर कंपन्यांसोबत शेअर केलं जाईल. पण इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की, नवी पॉलिसी केवळ बिझनेस अकाउंटसाठी आहे. म्हणजेच जर आपण Whatsappच्या बिझनेस अकाउंटवरुन चॅट केलंत तर केवळ तोच डेटा कंपनी घेईल आणि इतर कंपन्यांना देईल. पण जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत किंवा नातेवाईकासोबत नियमित Whatsappवरुन चॅट केलं तर आपलं चॅटिंग कंपनी पाहणार नाही. म्हणजेच नवी प्रायव्हसी पॉलिसी केवळ बिझनेस अकाउंटसाठी असून ती स्विकारल्यास त्याचा खासगी चॅटवर परिणाम होणार नाही

Print Friendly, PDF & Email
Share