शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा

भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव वंजारी यांची मागणी

अजिंक्य भांडारकर/ प्रहार टाईम्स
लाखनी २९ :- धान उत्पादक शेतकऱ्यांनी हलक्या जातीच्या धानाची मळणी सुरू केली असली तरी शासनाकडून एकात्मिक धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून पडेल दराने धान खरेदी सुरू असल्याने लवकरात लवकर शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करून हमी भावाने धान खरेदी करण्यात यावे. असी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव वंजारी यांनी केली आहे.
जिल्ह्यात कोरडवाहू शेतजमिनीचे प्रमाण अधिक असल्याने पावसाचे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी ९० ते १०० दिवसात निघणाऱ्या हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड केली आहे. सध्या स्थितीत हलके धान परिपक्व झाले असून ढगाळ वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी मळणी केली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी वित्तीय संस्था , सावकार , नातेवाईक यांचेकडून रक्कम घेतली आहे. त्या रकमेची परतफेड धान विकून केली जाते. अनेक शेतकरी हमीभाव आणि बोनस मुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विकतात. पण नोव्हेंबर महिना सुरू होणार असला तरी सुद्धा शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले गेले नाही. याचा फायदा व्यापारी घेत असून पडेल दराने धानाची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचे मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याचा विचार करून शासनाने सरकारी धान खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शेषराव वंजारी यांनी केली आहे.

Share