सोनू सूद-कलेक्टरमध्ये मदतीवरून रंगले ‘ट्विटर वॉर’, वाचा नेमकं काय झालं..?

कोरोनाच्या संकटात गरिबांचा कैवारी म्हणून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद समोर आला. वैद्यकीय यंत्रणा पुरती कोलमडलेली असताना, ‘देवदूत’ बनून सोनू सूद मदतीसाठी धावून जात आहे. मात्र, अशाच एका मदतीवरून सोनू सूद आणि एका कलेक्टरमध्ये ‘ट्विटर वॉर’ (Twitter war) रंगले. अखेर सोनू सुदपुढे कलेक्टरला माघार घ्यावी लागली.

त्याचं झालं असं.. ओरिसातील गंजाम जिल्ह्यातील एका गरजूने बेडसाठी सोनू सूदला साकडे घातले. सोनू सूद यानेही तातडीने मदत पोहोच केली. तशी माहिती त्याने ट्विटरवर दिली. मात्र, सोनूच्या ‘ट्विट’ला उत्तर देताना गंजाम जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी ‘अशी कोणतीही मदतच मिळाली नाही’ असा दावा केला.

‘संबंधित रुग्ण महापालिकेच्या निगराणीखाली असून, आम्ही त्याला ‘होम आयसोलेट’ (Home Isolate) केले आहे. आमचा सोनू सूत वा त्याच्या फाऊंडेशनशी कुठलाही संपर्क झालेला नाही..’ असे सांगितले.

गंजाम येथील कलेक्टरच्या या उत्तरावर सोनूने थेट पुरावेच सादर केले. संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांसोबत झालेल्या संवादाचे ‘स्क्रीन शॉट’ (Screen Shot) काढून ते ‘रिट्विट’ केले. ‘सर, गरजू व्यक्तीने तुमच्याकडे मदत मागितली होती, असा दावा आम्ही कधीच केला नाही. त्यांनी आमच्याकडे मदत मागितली. त्यानंतर आम्ही त्यांच्यासाठी बेडची व्यवस्था केली..’

सोनू सूद याने थेट पुरावेच सादर केल्यावर कलेक्टर साहेबांनी माघार घेत, सोनू सूद आणि त्याच्या फाऊंडेशनचे कौतुक केले. “आमचा हेतू तुमच्या सिस्टीमवर टीका करण्याचा नव्हता. रुग्णाला बेड देण्यासाठी आमची स्वतःची टीम आहे. त्यानंतरही कोणाला बेडबाबत काही समस्या आहे की नाही, हे तपासणे आमचे कर्तव्य होते. आपण आणि आपली संस्था चांगले काम करीत आहात..”

दरम्यान, सध्या देशात ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूद याने फ्रान्स आणि इतर देशातून ‘ऑक्सिजन प्लांट’ (Oxygen Plant) मागविले आहेत. लवकरच ते देशातील वेगवेगळ्या ठिकाणी बसण्यात येणार असल्याचे समजले.

Share