अभिमानास्पद ! २ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल


वृत्तसंस्था / मुंबई :
मागील महिन्यात कोरोना महामारीने महाराष्ट्रात थैमान घातलं होतं. महाराष्ट्राची रूग्णसंख्या ही देशात सर्वात जास्त होती. महाराष्ट्रात दररोज 60 हजाराच्यावर रूग्ण सापडत होते. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न केला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला लसीकरण करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रात 2 कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला आहे.
लसीकरणाचा 2 कोटी विक्रमी टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरलं आहे. ही देशातली अव्वल कामगिरी असून या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारं महाराष्ट्र अव्वल आल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आरोग्य यंत्रणेची पाठ थोपटली आहे.


राज्यात कोविशील्ड लसीच्या प्रतीक्षेत 16 लाख जण आहेत. कोवॅक्सिन लसीचे केवळ 35 हजार डोसच उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत. तर केंद्राने दिलेले 35 हजार डोस आहेत. हे सर्व डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार असल्यानं राज्यात काही काळ 18 ते 45 वयोगटाच्या लोकांचे लसीकरण थांबवण्यात आल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केल्याबद्दल आपल्या खात्याच्या अखत्यारित असलेल्या आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. त्यांनीही समाज माध्यमातून लसीकरणाचा काेट्यावधींचा टप्पा पार केल्याची माहिती त्यांंनी ट्विटद्वारे प्रसिद्ध केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share