तिरोड्यात 33 भरलेले व 97 खाली गॅस सिलेंडर चोरट्यांनी केले लंपास
तिरोडा, दि.17 : जिल्ह्यात कोविडमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी एकीदडे जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन दिवसरात्र परिश्रम घेत आहे तर दुसरीकडे चोरी-घरफोडीच्या घटना अज्ञात चोर घडवून आणत आहेत. नुकतीच गोंदिया जिल्ह्यात तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या ग्राम खैरबोडी येथील एचपी गॅस गोदामातील 33 भरलेले व 97 खाली झालेले घरगुती गॅस सिलेंडर चोरून चोर पसार झाले. ही चोरी 15 मेच्या सायंकाळी ते 16 मेच्या सकाळी 7 वाजतादरम्यान घडली.
ग्राम खैरबोडी येथे एचपी गॅस सर्विसेसचे गोदाम आहे. भरून आलेले सिलेंडर व रिक्त झालेले सिलेंडर येथे ठेवले जातात. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्राम खैरबोडी येथे ठेवलेले एचपी कंपनीचे प्रत्येकी 14 किलो गॅसने भरलेले लाल रंगाचे 33 नग सिलेंडर (प्रत्येकी किंमत 2328 रुपये) एकूण किंमत 76 हजार 824 रुपये व 97 नग खाली गॅस सिलेंडर (प्रत्येकी किंमत 1450 रुपये) एकूण किंमत 1 लाख 40 हजार 650 रुपये असा एकूण 2 लाख 17 हजार 474 रुपये किंमतीचा माल चोरून अज्ञात चोर पसार झाले. हे सर्व सिलेंडर एचपी गॅस कंपनीचे होते.
फिर्यादी प्रभाकर मोतीराम भोयर (वय 62) रा. तकिया वॉर्ड, भंडारा यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम 457, 461, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिरोडा पोलीस चोरांच्या शोधात असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर हणवते करीत आहेत