Quarantine साठी घरात जागा नव्हती, पठ्ठ्याने 11 दिवस ठोकला झाडावर मुक्काम
क्वारंटाईनसाठी घरात जागा नव्हती, पठ्ठ्याने 11 दिवस ठोकला झाडावर मुक्काम https://t.co/UeIsg8LQHg #CoronavirusPandemic #Quarantine #CovidIndia
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 17, 2021
हैदराबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसलेल्या भारतात गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले आहे. बेडस्, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने अनेक करोना रुग्णांचे हाल पाहावेनासे झाले आहेत. या सगळ्यामध्ये आता आणखी एका प्रसंगाची भर पडली आहे.
कोरोना झाल्यानंतर रुग्णाला घरातील इतर व्यक्तींपासून तात्काळ वेगळे राहण्याची गरज असते. अन्यथा इतर व्यक्तींनाही कोरोनाची बाधा होण्याची शक्यता असते. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र, क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून 11 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची माहिती पुढे आली आहे.
या तरुणाचे नाव शिवा असून तो अवघ्या 18 वर्षांचा आहे. कोठानंदीकोटा गावात राहणाऱ्या शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरातच क्वारंटाईन व्हायला सांगितले होते. मात्र, घर लहान असल्याने शिवाला तिथे राहणे शक्य नव्हते. अशावेळी गावकऱ्यांनी शिवाला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, कोणीही शिवाच्या मदतीसाठी पुढे आले नाही. तेव्हा शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून 11 दिवस काढले.
कुटुंबीय दोरीला बांधून जेवण द्यायचे
कोठानंदीकोटा गावात 350 कुटुंबे राहतात. प्राथमिक आरोग्य केंद्र पाच किलोमीटर अंतरावर तर नजीकचे रुग्णालय 30 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाला कोरोना झाल्यामुळे आजुबाजूचे लोक घरातून बाहेर पडायला तयार नव्हते. त्यामुळे शिवाने झाडावरच राहण्याचा निर्णय घेतला. एक बादली दोरीला बांधून त्यामधून शिवाला अन्नपदार्थ व इतर गरजेच्या गोष्टी पुरवल्या जात होत्या.