आश्चर्यकारक ! MPमध्ये नकली रेमडेसिवीर घेतलेले 90 टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

भोपाळ :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच रूग्णालयात बेड्सचा तुटवडा तसेच औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन हे जीवनदायी ठरत असल्याचं काही लोकांचं मत झालं. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि परिणामी मागणी वाढल्याने पुरवठा कमी झाला. अशातच या इंजेक्शनच्या साठेबाजीला सुरुवात झाली आणि काळाबाजारही होऊ लागला.

रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार याबरोबरच बनावट इंजेक्शन बनवून विकणाऱ्यांच्या टोळ्याही देशातील अनेक भागांमध्ये सक्रीय झाल्या. बनावट इंजेक्शन बनवून ते कोरोना रुग्णांना देण्यात आलं. परंतु, मध्यप्रदेशमध्ये बनावट इंजेक्शन घेतलेले 90% पेक्षा अधिक कोरोनारूग्ण बरे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बनावट इंजेक्शन बनवून मध्यप्रदेशमध्ये कोरोना रुग्णांना ते देण्यात आले होते. याप्रकरणी माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांकडुन तात्काळ कारवाई करत जबलपुरमधून काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरती खूनाचे खटले दाखल करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु आता त्यांनी बनवलेले बनावट इंजेक्शनमुळे 90 टक्क्यांपेक्षाही जास्त रुग्ण बरे झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Share