परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार-राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

PraharTimes
वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक केली होती. या निर्णयामुळं राज्यातील सर्व आरटीओ चेक पोस्टवर अनेक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर अखेर चेकपोस्टवर आरटीपीसीआर चाचणी करण्याचा हा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे.


राज्याच्या हद्दीत प्रवेश करताना सर्वच मालवाहतूक वाहनांसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केल्यानं सर्व चेक पोस्टवर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सीमा भागातील बहुतांश चेकपोस्टवर हेच चित्र पाहायला मिळत होतं. महाराष्ट्र गुजरात बॉर्डरवर चारोटी चेक पोस्टवर यामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. त्यामुळंच राज्य सरकारनं चेकपोस्टवरच कोरोनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मालवाहतूक दार संघटनांनी केली होती.


प्रत्यक्षात ट्रक चालकांना ट्रक सोडून चाचणी केंद्रावर जाणं शक्य नव्हतं. त्यामुळं माल वाहतूकदार संघटनेनं चाचणीची ही अटच रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला असून, आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसल्याचा नवा आदेश काढण्यात आला आहे.
या निर्णयानंतर चेकपोस्टवरून आता वाहनचालकांना केवळ फक्त तापमान आणि लक्षणं तपासून सोडण्यात येणार असल्याचा निर्णय झाला. चाचणीसाठी थांबवून धरलेली वाहनंही लगेचच सोडण्यात आली. अखिल भारतीय माल वाहतूकदार संघटनेच्या वतीनं कुलतरण सिंग अटवाल, बाबा शिंदे यांनी यासाठी सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी व्हावा आणि संसर्ग होण्यासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या चालकांचा हातभार लागू नये म्हणून राज्याच्या सीमेवर चाचणीचा निर्णय घेण्यात आला होता. पण त्यामुळं झालेल्या अडचणींनंतर तो लगेचच मागे घेण्यात आला.

Print Friendly, PDF & Email
Share