सर्वात प्रभावी Sputnik V लशीची किंमत जाहीर, इतक्या रुपयांना मिळणार!

नवी दिल्ली: रशियाची कोरोना व्हायरसवरील लस Sputnik V ची भारतातील किंमत जाहीर झाली आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. डॉ. रेड्डीज ही औषध निर्माता कंपनी रशियाची ही लस भारतात बनविणार असून ‘मेक इन इंडिया’ची ही लस आणखी स्वस्त मिळण्याची अपेक्षा आहे.

Sputnik V ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.

रशियातून आयात केलेल्या या Sputnik V लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.40 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे. भारतात या लसीचे उत्पादन सुरु झाले की या लसीची किंमतही कमी होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.

रशियात तयार झालेली Sputnik V लस पुढील आठवड्यात भारतीय बाजारात उपलब्ध होईल. नीती आयोगाचे सदस्य असलेले डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबद्दलची माहिती दिली. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं विविध स्तरांवर काम करत आहोत. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत 216 कोटी डोस उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे, असंही पाॅल यांनी सांगितलं.

Share