नक्षलवादी कोरोनाच्या विळख्यात : तब्बल ४०० नक्षलींना कोरोनाची लागण तर १० जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / गडचिरोली : देशभरात कोरोनाने थैमान घातले असतांना आता छत्तीसगडच्या जंगलातही कोरोना विषाणूचा संसर्ग पाहायला मिळतोय. कारण छत्तीसगडमधील नक्षल दलमच्या अनेक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बस्तर क्षेत्रात 400 नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतेय. तर 10 नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनावरील उपचारांसाठी नक्षलवाद्यांना जंगलाबाहेर येऊन उपचार घेणं गरजेचं बनलं आहे.
जंगलात लपून बसलेल्या शेकडो नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक नक्षल दलम चिंताग्रस्त आहेत. बिजापूर सुकमा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांनी सभा आयोजित केली होती. या सभेत जवळपास 400 नक्षलवादी उपस्थित होते. या सभेतूनच नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छत्तीसगडच्या बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी आणि सीआरपीएफच्या जवानांची चकमक झाली होती. यात नऊहून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं. मात्र, या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. 250 नक्षलवाद्यांशी सामना करताना जवानांनी पाच तास झुंज दिली होती.
2 एप्रिल रोजी कोब्रा, सीआरपीएफ, एसटीएफ आणि डीआरजी ने एक संयुक्त ऑपरेशन हाती घेतले. तर्रेम, उसूर, पामेड आणि मनिपा (सुकमा) आणि नरसापूरम (सुकमा) येथून सुरक्षा दलाचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. सुरक्षा दलाला माओवादी एकत्र जमणार असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे हे ऑपरेशन हाती घेण्यात आले. 3 एप्रिल रोजी दुपारी सुकमा-बीजापूर बॉर्डवर जोनागुडा गावाजवळ माओवाद्यांनी अचानक हल्ला केला. ही चकमक जिथे झाली तिथून सुरक्षा दलाचे तर्रेम शिबीर अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. नक्षलवाद्यांनी पाळत ठेवून हा हल्ला केला होता. 2010मध्ये ताडमेतला येथे आणि 2020मध्ये मिनपा येथे झालेल्या हल्ल्यासारखाच हा हल्ला होता. हा ठरवून घेतलेला निर्णय होता.
आम्ही माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात होतो. आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो. ही मोठी लढाई होती, ती निकराने लढल्या गेली, असं या अभियानाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितलं. माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे. सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.