१ जूनलाच केरळमध्ये दाखल होणार मान्सून : महाराष्ट्रातही समाधानकारक पावसाचा अंदाज


वृत्तसंस्था / मुंबई :
कोरोनाच्या संकटात संपूर्ण देश अडचणीत असताना शेतकऱ्यांसाठी मात्र एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा देशात पावसाचं आगमन वेळेत होणार आहे. 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यात 10 जूनपर्यंत तळ कोकणामध्ये आणि मुंबईत पावसाचं आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी या माध्यमातून आली आहे. देशात आणि राज्यात मान्सूनचं वेळेत आगमन होणार असून समाधानकारक असा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशाचा विचार करता 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. म्हणजे वेळेत पावसाचं आगमन होईल. तर राज्यात तळकोकणामध्ये आणि मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल. तर 15 ते 20 जून दरम्यान मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कुलाबा प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.


एकीकडे मान्सून वेळेत दाखल होणार असल्याची शेतकऱ्यांसाठी आनंदाजी गोष्ट असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर आगामी काही दिवसांत संकट येण्याचीही शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसंच विजेच्या कडकडाटासह मध्य स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेध शाळेने वर्तवली आहे. तर 6 ते 10 मे दरम्यान नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला असल्यानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हवामान विभागानं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत चांगलया पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मान्सून विभागाच्या मते यंदा दक्षिण-पश्चिम मान्सून 98 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. त्यामुळं जर शेतकरी सुखात राहिला तर अशा मोठ्या संकटावरही आपण मात करू शकतो.

Print Friendly, PDF & Email
Share