नागपूर मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात मोठी आग : संपूर्ण कार्यालय जळून खाक
प्रहार टाईम्स
प्रतिनिधी / नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या राज्य आयुक्तालयात आज (2 मे) सकाळी मोठी आग लागली. या आगीमध्ये मनरेगाचा राज्य आयुक्तालय पूर्णपणे बेचिराख झाला असून या ठिकाणी असलेल्या राज्यभरातील फाईल, दस्तावेज आणि संगणकांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये (मुंबई व मुंबई उपनगर हे 2 शहरी जिल्हे वगळून) ग्रामीण भागात मनरेगा योजनेचे जे काही काम होतात, त्या संदर्भातला सर्वात मोठं म्हणजेच आयुक्त कार्यालय नागपुरात आहे.
नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरात प्रशासकीय इमारत क्रमांक 2 मध्ये पहिल्या माळ्यावर हे कार्यालय आहे. आज सकाळी आठच्या सुमारास या कार्यालयात अचानक मोठी आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. मात्र अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवेल त्याच्या आधीच कार्यालयात मोठं नुकसान झालेलं होतं. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग आठ मजल्यांच्या प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यांवर पसरली नाही. तसे झाले असते तर प्रशासकीय इमारतीत मोठ्या प्रमाणावर असलेल्या इतर विभागांच्या कार्यालयांचं खूप मोठं नुकसान झालं असतं.
मनरेगा योजनेचे आयुक्तालय शुक्रवार संध्याकाळी बंद आल्यामुळे ही दुर्घटना आहे की घातपात असा संशयही निर्माण झाला आहे. त्याचा तपास पुढे होत राहिल मात्र सध्या तरी या आगीने राज्य आयुक्तालयातील मनरेगा योजनेशी संबंधित सरकारी दस्तावेज आणि संगणकीय प्रणालीचं मोठं नुकसान केलं आहे.