भाजपाची विजयी घौडदौड मंदावली?2 वर्षात भाजपाने सात राज्ये गमावली, आज काय होणार?

मोदी लहर फिकी पडत आहे का ?

पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजपा या निवडणुकांकडे पूर्व आणि दक्षिणेकडील पक्षविस्ताराची संधी म्हणून पाहात आहे. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सातत्याने सांगितले होते की, लोकसभेच्या ३०३ जागा जिंकणे हा पक्षाच्या यशाचा कळस नव्हे. भाजपाला देशभर विस्तारण्यास वाव आहे, त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांच्या या मेहनतीला किती यश मिळेल हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

उत्तर भारतातील राज्ये भाजपाचे बालेकिल्ले मानले जातात. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, अंशत: बिहार या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे आणि ती कायम राखण्यासाठी भाजपा अटीतटीची लढाई लढेल; पण उत्तरेतील विधानसभा निवडणुका २०२२ पासून सुरू होतील. त्यापूर्वी भाजपाला पूर्व तसेच दक्षिणेकडील राज्ये ताब्यात घ्यायची आहेत किंवा त्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची मुळे रुजवायची आहेत. यासाठीच भाजपाने अगदी आसामपासून ते दक्षिणेतील तमिळनाडू, केरळमध्येही यंदाच्या विधानसभांसाठी चांगलाच जोर लावल्याचं चित्र दिसत आहे. खास करुन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रातील अनेक मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही प्रचारसभा घेत ममता बॅनर्जींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी जोर लावल्याचं चित्र दिसत आहे. निवडणूक पूर्व चाचण्यांमध्ये आसाम वगळता इतर ठिकाणी भाजपाला यश मिळणार असलं तरी बहुमताच्या जादुई आकड्यापर्यंत पोहचणं कठीण होईल असं अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मात्र असं असलं तरी आसाम वगळता एका जरी राज्यात भाजपाने बाजी मारली तर भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांची संख्या १८ वर जाणार आहे.

भाजपाची एकहाती सत्ता असणारी राज्ये

गोवा
गुजरात
हिमाचल प्रदेश
कर्नाटक
मध्य प्रदेश
उत्तर प्रदेश
उत्तराखंड

युती करुन सत्तेत असणारी राज्ये

अरुणाचल प्रदेश (जेडीयू आणि एनपीपीसोबत युती)
आसाम (आसाम गण परिषदसोबत युती)
बिहार (जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीसोबत युती)
हरयाणा (जननायक जनता पार्टीसोबत युती)
मणिपूर (नॅशनल पिपल्स पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत युती)
मेघालय (युनायटेड डेमोक्रेटीक पार्टी, नॅशनल पिपल्स पार्टी, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रण्ट, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रेटीक पार्टी)
मिझोरम (मिझो नॅशनल फ्रण्टसोबत युती)
नागालॅण्ड (नॅशनलिस्ट डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी)
सिक्कीम (सिक्कीम क्रांतीकारी मोर्टा, सिक्कीम डेमोक्रॅटीक फ्रण्ट (एलए) सोबत युती)
त्रिपुरा (इंडिजिनियस पिपल फ्रण्ट ऑफ त्रिपुरासोबत युती)

भाजपा विरोधी पक्षात असणारी राज्ये

आंध्रप्रदेश
छत्तीसगड
दिल्ली
झारखंड
महाराष्ट्र
ओदिशा
राजस्थान

२०१४ साली काय होती स्थिती…

२०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यानंतर ही विजयी घौडदौड मंदावली. २०१४ साली भाजपा गुजरात, मध्य प्रेदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते.

Share