लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का? माजी अधिष्ठाता चमनलाल यांचा आक्षेप
वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. मात्र, या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने एका सेवानिवृत्त प्राध्यापकाने आक्षेप घेतला आहे. ‘आतापर्यंत मी कोरोना लस घेतली नाही. मी आजही कोरोना लस घेण्यास उत्सुक नाही. कारण कोरोना लसीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आलेला आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्राध्यापक आणि पंजाब विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता चमनलाल यांनी यावर आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘कोरोना लसीकरण हे राष्ट्रीय अभियान आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असायला हवी. मात्र, भारतातील असहाय जनतेला सत्तेतील नेत्याचा फोटो असलेले प्रमाणपत्र दिले जात आहे. याचा मी निषेध करतो. माझे वय आता जवळपास 74 वर्षे आहे. मला कोरोना लसीची गरज आहे. मात्र, पंजाबचा नागरिक म्हणून आणि जगाचा नागरिक म्हणून काही आक्षेप नोंदवू इच्छितो. या आक्षेपांमुळेच मी आतापर्यंत कोरोना लस घेतली नाही. मी आजही कोरोना लस घेण्यास उत्सुक नाही. लसीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. हा फोटो प्रमाणपत्रावर अनिवार्य आहे का?’
तसेच जगातील इतर कोणत्याही देशात लसीकरण प्रमाणपत्रावर राजकीय नेत्याचा फोटो छापण्यात आला नाही. पण आपल्या देशात पंतप्रधान मोदींचा फोटो छापण्यात आला आहे. त्यावर मी आक्षेप नोंदवत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिले आहे.