अनिल देशमुखांच्या १० मालमत्तांवर सीबीआयची धाड; अनिल देशमुखांविरोधात FIR दाखल

वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन देशमुख यांच्या घरासह त्यांच्या १० मालमत्तांवर सीबीआयचे अधिकारी PPE किट घालून छापे टाकले आहेत.

https://twitter.com/ani/status/1385803406317481984?s=21

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्या प्रकरणात सीबीआयनं देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सीबीआयकडून सुरू असलेली अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी काल पूर्ण झाली.

मुंबई उच्च न्यायालयानं गेल्याच आठवड्यात या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपवला. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो की नाही, हे पाहण्यासाठी न्यायालयानं सीबीआयला १५ दिवसांचा कालावधी दिला. न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयनं देशमुख आणि इतरांची चौकशी सुरू केली.
अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करून परमबीर सिंग यांनी खळबळ उडवून दिली होती. यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणी सीबीआयनं १४ एप्रिलला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. या प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक (संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे), निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंचे दोन चालक, बार मालक, मुंबई पोलीस दलातील अधिकारी यांची चौकशी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share