सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात हतबल? आम्ही पाया पडायलाही तयार : आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रहार टाईम्स
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार पूर्णपणे हतबल झालं आहे का? असा सवाल वारंवार विचारला जात आहे. आता पुन्हा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांंच्या प्रतिक्रियेनंतर असाच सवाल उपस्थित केला जात आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या तुटवड्याबाबत आम्ही पाया देखील पडायला तयार आहोत, असं वक्तव्य टोपेंनी केलं आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
रेमडेसिव्हीर बाबत बोलताना ते म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीर सात कंपन्या बनवतात, साधरण 36 हजार रेमडेसिव्हीर रोज मिळत असे पण आता केंद्र सरकारने कोणत्या राज्याला किती वाटायचं याचं नियंत्रण स्वत:कडे घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला केवळ 26 रेमडेसिव्हीरचा वाटा मिळतो आहे. 21 ते 30 एप्रिलपर्यंत अशाप्रकारे रेमडेसिव्हीर देण्याचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे. या निर्णयामुळे राज्याला दररोज 10 हजार रेमडेसिव्हीरची कमतरता भासेल.’
दररोज 36 हजार मिळणारं रेमडेसिव्हीर येणाऱ्या एक दोन दिवसा 60 हजारांवर जावं आणि 1 पर्यंत 1 लाखांवर अशी आमची मागणी होती, असंही टोपे यावेळी म्हणाले. या निर्णयामुळे राज्य सरकारसमोरील आव्हानं वाढली आहेत आणि या आव्हानांना कसं तोंड द्यायचं याविषयी बैठक घेणार असल्याची प्रतिक्रिया टोपे यांनी दिली आहे. निर्यात करण्यासाठी देखील केंद्राची परवानगी आवश्यक आहे, शिवाय एक्सपोर्ट्सना देखील थेट विक्री कऱण्यास परवानगी नाही आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही रेमडेसिव्हीर मिळणंही ना च्या बरोबर आहे, असं टोपे म्हणाले. राजेश टोपे यांनी केंद्राला विनंती केली आहे की पीएओ स्तरावर रेमडेसिव्हीरच्या पेटंट कंपनीशी बोलून महाराष्ट्राचा आणि देशाचा हा प्रश्न मार्गी लावावा.
कोरोना लशीबाबत टोपेंनी अशी माहिती दिली आहे की, आदर पुनावला यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 महिन्यापर्यंत केंद्राकडून बुकिंग झाले आहे, त्यामुळे आपल्याला निदान महिनाभर तरी संबंधित लस खरेदी करणे शक्य होणार नाही. बायोटेकशी देखील मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी चर्चा करत आहेत. शिवाय इतर देशांतील व्हॅक्सिन महाग आहेत. त्याच्या समवेत वरिष्ठ स्तरावर चर्चा करून कमी दरात उपलब्ध करता येईल का याची चाचपणी सुरू आहे.
रेमडेसिव्हीरबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘रेमडेसिव्हीरचा तुटवडा निश्चितपणे आहे. पण रेमडेसिव्हीर हे काही रामबाण उत्तर नाही. अत्यंत गंभीर रुग्णांना ते दिलं जावं असा सध्याचा प्रोटोकॉल आहे. व्हेंटिलेटरवर असणाऱ्यांना पहिल्या फेजमध्ये रेमडेसिव्हीर दिलं तर त्याचा फायदा होतो, असं टास्क फोर्सचं मत आहे.’ याच हिशोबाने या औषधाचा वापर व्हावा अशी विनंती राजेश टोपे यांनी सर्व डॉक्टरांना केली आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याबाबत विचारले असता राजेश टोपेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेसाठी राज्य सरकार अक्षरश: विनंती करायला तयार आहे, पाया पडायला तयार आहे. पण ऑक्सिजन पुरवठ्याचा कोटा केंद्र शासनाकडे आहे. तो त्यांनी अधिकाधिक वाटावा, आणि ट्रान्सपोर्टवेळी ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्राला पुरवावा.’