मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन
मुंबई :
मुकेश अंबानी यांच्या कंबाला हिल परिसरातील घऱाजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्यानंतर खळबळ उडाली. ही कार रोडवर अंबानी यांच्या ‘अॅन्टिलिया’ निवास्थानाजवळ उभी करण्यात आली होती. गाडीत जिलेटिन या स्फोटकांच्या सुट्ट्या कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या स्फोटकांचं नागपूर कनेक्शन समोर आलं आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कारमधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात. सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी यासंबंधी मुंबई पोलिसांनी माहिती दिल्याचे सांगितले.
“गुरूवारी मध्यरात्री १.३० वाजता मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली’, असे सत्यनारायण नुवाल यांनी सांगितले.
स्फोटकांमागे इंडियन मुजाहिद्दीन?
दरम्यान इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित एका सदस्याची माहिती मिळवण्याची जबाबदारीदेखील एका टीमवर सोपण्यात आली आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या या सदस्याने २०१३ मध्ये अंबानींच्या मरिन ड्राइव्हमधील कार्यालयात धमकी देणारं एक पत्र पाठवलं होतं. इतर दोन टीम आतापर्यंत हाती आलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करत आहे.
याशिवाय पोलीस बीएमसी पार्किंगमधील फुटेजची तपासणी करत आहे. येथे आदल्या रात्री एक मसिर्डीज संशयास्पदपणे पार्क करण्यात आली होती. पार्किंगची जबाबदारी असणाऱ्याची पोलीस चौकशी करत आहेत.